जिल्ह्यातील १४३ गावांचे गावकारभारी आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:41+5:302021-01-18T04:24:41+5:30
सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. सकाळी दहा वाजता ...

जिल्ह्यातील १४३ गावांचे गावकारभारी आज ठरणार
सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारपर्यंत या गावांचे नवे गावकारभारी ठरतील. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता यातील ९ बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींसाठी ८०.२२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता दहा ठिकाणी प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणुका झालेल्या ५५१ प्रभागांच्या मतमोजणीसाठी १३१ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे तर ४९ फेऱ्यांचे नियोजन आहे. सर्वाधिक ९ फेऱ्या मिरज तालुक्यातील मतमोजणीसाठी होणार आहेत तर वाळवा तालुक्यात एक तर शिराळा तालुक्यात दोन फेऱ्यांतच तेथील प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा निकाल घोषित होणार आहे.
जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील सर्वाधिक ३६, जत तालुक्यातील ३० तर मिरज तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बहुतांश गावांची निवडणूक झाली असल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे. निवडणूक निकालाबाबत गावपातळीवर आतापासूनच अंदाज बांधले जात असलेतरी प्रत्यक्षात सोमवारी दुपारपर्यंत अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राबाहेर व निवडणूक झालेल्या गावातही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्तासह मिरवणुका व जल्लोषावरही पोलिसांचा वॉच असणार आहे.
चौकट
६७७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मतमोजणी प्रक्रियेसाठी ६७७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १३४ मतमोजणी पर्यवेक्षक, १९८ मतमोजणी सहायक तर ३५१ इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी दिली.
चौकट
तालुकानिहाय ग्रामपंचायत, फेऱ्यांची संख्या
तालुका ग्रामपंचायत संख्या झालेले मतदान फेऱ्यांची संख्या
मिरज २२ ७८.४४ ९
तासगाव ३६ ७९.८२ ६
कवठेमहांकाळ १० ८३.६८ ३
जत २९ ८३.५५ ८
आटपाडी ३० ७७.७९ ९
खानापूर ११ ७६.११ ४
पलूस १२ ८२.६१ ६
कडेगाव ९ ८०.३६ ६
वाळवा २ ८५.८७ १
शिराळा २ ८३.०७ २