विकास सूर्यवंशींची शिवसेनेतून हकालपट्टी
By Admin | Updated: April 25, 2015 00:12 IST2015-04-25T00:11:58+5:302015-04-25T00:12:01+5:30
कार्यकारिणी बरखास्त : पक्षविरोधी कारवाई

विकास सूर्यवंशींची शिवसेनेतून हकालपट्टी
सांगली : मिरजेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, मिरज तालुकाप्रमुख रवी नाईक यांच्यावर पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवून शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिवाय जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे शिवसेनेतील गटबाजी थोपविण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेतील गटबाजीतून संपर्क प्रमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी व माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार, बजरंग पाटील यांच्या गटात वैमनस्य आहे. पदाधिकारी निवडीवरून दोन्ही गटात पराकोटीचा संघर्ष आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून नव्याने कार्यकारिणी नियुक्त केली जाणार आहे. शिवसेना कार्यालयातून शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, मिरज तालुकाप्रमुख रवी नाईक यांची २३ रोजी शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. (प्रतिनिधी)
प्रतिमेस अभिषेक
प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून विकास सूर्यवंशी यांच्याविरुध्द निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील चंद्रकांत मैगुरे, विशाल रजपूत, सुनीता मोरे आदी उपस्थित होते.