विजयनगर नाल्याचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:00+5:302021-09-18T04:28:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विजयनगर येथील नैसर्गिक नाल्याची स्थिती गटारीसारखी झाली आहे. महापालिकेने नाल्यालगतच अनेक बांधकामांना परवाने दिले ...

Vijayanagar Nala became a gutter | विजयनगर नाल्याचे झाले गटार

विजयनगर नाल्याचे झाले गटार

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विजयनगर येथील नैसर्गिक नाल्याची स्थिती गटारीसारखी झाली आहे. महापालिकेने नाल्यालगतच अनेक बांधकामांना परवाने दिले आहेत. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक मार्ग बदलून त्याला गटारीचे स्वरुप देण्यात आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार केल्या. पण ढिम्म महापालिका प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे.

विजयनगर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायालयाची नवी इमारत झाल्यापासून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून कित्येक वर्षापासून नैसर्गिक नाला वाहतो. नाल्याशेजारी बांधकामांना परवानगी देताना काही नियम आहेत. पण नगररचना विभागाने हे नियम गुंडाळून अनेकांना परवाने दिले. परिणामी नैसर्गिक नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यावर अतिक्रमण करून इमारती उभारल्या आहेत. काहींनी घरे बांधली आहेत, तर काहींना कंपाऊंड घातले आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा मार्गच बदलला आहे. त्यामुळे या नैसर्गिक नाल्याची स्थिती गटारीसारखी झाला आहे. गेल्या दोन वर्षात तर या परिसरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पूर्वी केवळ पावसाचे पाणी या नाल्यातून वाहात होते. आता त्यात मैलामिश्रित व सांडपाणीही सोडले जात आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरले आहेत. अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. विजयनगर नाल्याचा प्रश्न कधी मिटणार? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

चौकट

नागरिक जागृती मंच आंदोलन करणार

विजयनगर नाल्याचे रूपांतर गटारीत झाले आहे. नाल्यावर छोट्या सिमेंट पाईप टाकून बांधकामे करण्यात आली आहेत.

थोडा पाऊस पडला तरी महापुरासारखी स्थिती होते. स्थानिक नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. तेथील नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.

Web Title: Vijayanagar Nala became a gutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.