त्या दृष्याने पतंगरावांना कर्तव्यपूर्तीचा आनंद

By Admin | Updated: May 25, 2016 00:19 IST2016-05-24T23:43:04+5:302016-05-25T00:19:52+5:30

वडियेरायबाग बंधारा तुडुंब : ऐन दुष्काळात येरळा नदी प्रवाही

In that view, kite-flying enjoyment of duty | त्या दृष्याने पतंगरावांना कर्तव्यपूर्तीचा आनंद

त्या दृष्याने पतंगरावांना कर्तव्यपूर्तीचा आनंद

प्रताप महाडिक-- कडेगाव  -कडेगाव : तालुक्यातील वडियेरायबाग येथे येरळा नदीवर बांधलेला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ऐन दुष्काळात तुडुंब भरलेला आहे. हे नयनरम्य दृष्य पाहून माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम आनंदाने भारावून गेले. या विधायक कामात मोलाचा वाटा उचलल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपल्या राजकीय कारकीर्दीत विधायक कामांचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या या नेत्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद वाटला. ताकारीचे पाणी येरळा नदीत सोडल्यामुळे ऐन दुष्काळात येरळा प्रवाही झाली.
आनंदी क्षण आपल्या अवतीभोवतीच रेंगाळत असतात. परंतु ते क्षण टिपण्याची दृष्टी असावी लागते. आमदार पतंगराव कदम शिवणीहून वडियेरायबागला निघाले होते. वडियेरायबाग गावालगत येरळा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून गाडी निघाली असताना त्यांनी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. त्यांनी गाडीतून उतरून तुडुंब भरलेला बंधारा पाहिला आणि वडियेरायबागला एका कार्यकर्त्याला भेटायला गेले.
वडियेरायबाग येथे गेल्यावर कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, मी जलसंधारणमंत्री असताना हा बंधारा मंजूर केला. भूमिपूजन आणि उद्घाटनही मीच केले. आता हा तुडुंब भरलेला बंधारा पाहून खूप आनंद वाटला. घाटमाथ्यावरील कायम दुष्काळी भागात हरितक्रांती झाली. या योजनांसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्य कालवे, पोटकालवे आणि वितरिकाद्वारे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पाणी आले. टेंभूच्या पाण्याने नांदणी आणि ताकारीच्या पाण्याने येरळा या दोन नद्या खळखळ वाहत आहेत. ओढ्या-नाल्यामधूनही पाण्याचा प्रवाह सुरू आहे. इच्छापूर्तीचे खूप समाधान वाटल्याचे सांगून त्यांनी मनातील आनंद व्यक्त केला.

Web Title: In that view, kite-flying enjoyment of duty