जिल्ह्यातील ‘फिक्सिंग’मध्ये विट्याच्या सदाभाऊंचा बळी
By Admin | Updated: May 19, 2016 00:26 IST2016-05-18T23:33:54+5:302016-05-19T00:26:34+5:30
संजय पाटील : संघर्षाला घाबरत नाही; विट्यात गौप्यस्फोट

जिल्ह्यातील ‘फिक्सिंग’मध्ये विट्याच्या सदाभाऊंचा बळी
विटा : लोकसभा निवडणुकीत मला लोकांनी निवडून दिले. परंतु, मी राजकीय चौकटीत अडकून राहत नाही. कारण व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा व पक्षापेक्षा समाज मोठा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मालक कोणीही असो, मी संघर्षाला घाबरत नाही. समाजासाठी काम करीतच राहणार आहे, असे सांगून, जिल्ह्यात फिक्सिंगचे राजकारण चालते. विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या त्या फिक्सिंगच्या राजकारणाचेच माजी आमदार सदाशिवराव पाटील बळी ठरले आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी केला.
येथे आदर्श संकुलाच्या नोकरी मेळाव्यात खासदार पाटील बोलत होते. या कार्यक्रमास सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष वैभव पाटील आदी उपस्थित होते.
मी सदाभाऊंच्या कार्यक्रमास येतो, म्हणून काहींना शंका येते. परंतु, राजकारणाच्या पलीकडेही संबंध असतात. मला गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी सदाभाऊंनी, सर्वांशी संघर्ष करू नका, असा सल्ला दिला होता. पण संघर्ष जन्मजातच असल्याने तो मी टाळू शकत नाही, असे खा. पाटील यावेळी म्हणाले.
दुष्काळाशी सामना करणाऱ्या पालकांनी मुलांना मोठ्या अपेक्षेने उच्च शिक्षण दिले आहे. त्यामुळे मुलांकडून पालक व समाजाच्याही मोठ्या अपेक्षा आहेत. भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून वैभव पाटील यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे खा. पाटील म्हणाले.
नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी प्रास्ताविक केले. आतापर्यंत ३ हजार ७०० मुलांनी नोंदणी केली असून, त्यातील ३ हजार २०० मुलांच्या प्रत्यक्ष मुलाखती होऊन ८१० मुलांची नियुक्ती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, कॅम्पस संचालिका कु. पूजा पाटील, उपनगराध्यक्ष अॅड. सचिन जाधव, मिलिंद भागवत, प्रमोद शहा, विलास पवार, राहुल रास्कर, अविनाश चोथे, प्रताप सुतार उपस्थित होते. (वार्ताहर)