इस्लामपुरात रुग्णांची फसवणूक
By Admin | Updated: August 4, 2015 23:38 IST2015-08-04T23:38:27+5:302015-08-04T23:38:27+5:30
फलकावर अपुरी माहिती : अॅलोपॅथी-आयुर्वेदिक वैद्यकीय पदवीबाबत संभ्रम

इस्लामपुरात रुग्णांची फसवणूक
अशोक पाटील- इस्लामपूर -अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एम. डी., एम. एस. या पदवीधारक वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वत:च्या दवाखान्याबाहेर लावलेल्या फलकावर आपण कोणत्या शाखेचे पदवीधर आहोत, याचा सविस्तर उल्लेख न केल्याने ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांची फसवणूक होत आहे. दोन्ही विभागातील वैद्यकीय व्यावसायकांनी आपल्या पदवीचा सविस्तर उल्लेख करावा, अशी मागणी सर्वसामान्यांतून होऊ लागली आहे.
१५ ते २० वर्षांपूर्वी अॅलोपॅथीमधील एम. डी., एम. एस. ही पदवी धारण करणाऱ्या डॉक्टरांची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे अशा पदवीचे डॉक्टर जिल्ह्याच्या किंवा मोठ्या रुग्णालयात सेवेसाठी उपलब्ध असत. अलीकडील चार ते पाच वर्षात वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणीही एम. बी. बी. एस. नंतर एम. डी. (हृदयरोग), एम. एस. (सर्जन), एम. एस. (हाड), एम. डी. (बालरोग तज्ज्ञ) यांनी मोठ मोठे दवाखाने सुरू केले आहेत. त्याचा परिणाम आयुर्वेदिक व्यावसायिकांवर झाला आहे. आयुर्वेदिकमधील बी.ए.एम.एस. नंतर यामध्ये पुढील शिक्षण घेऊन एम. एस., एम. डी. पदवी मिळू लागली आहे. परंतु आयुर्वेदिक व्यावसायिक आपल्या दवाखान्याबाहेरील नामफलकावर आयुर्वेदिक असा उल्लेख न करता केवळ एम. डी., एम. एस. अशी पदवी टाकून रुग्ण खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. याला ग्रामीण व अशिक्षित रुग्ण बळी पडतात. तसेच रुग्णांवर चुकीचे उपचारही होत आहेत. यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.
शहर व ग्रामीण भागात उच्च पदवी असलेल्या काही आयुर्वेदिक व्यवसाय करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे फलकावर ‘आयुर्वेदिक’ असा उल्लेख केला आहे. परंतु बहुतांशी व्यावसायिकांनी जाणूनबुजून रुग्ण खेचण्यासाठी नामफलकावर अपुरी माहिती दिली आहे. अशा वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मध्यंतरीच्या काळात इस्लामपूर पालिकेने शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बोगस आणि चुकीची माहिती लिहून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांना काही मर्यादेपर्यंतच अॅलोपॅथीचे उपचार करण्याची परवानगी दिली आहे. परंतु बहुतांशी आयुर्वेदिक व्यावसायिक अॅलोपॅथीचा व्यवसाय करतात, तर काही व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयाच्या नामफलकावर आपल्या पदवीची सविस्तर माहिती देण्याची गरज आहे. जे माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी.
- डॉ. पी. टी. शहा,
एम. डी. हृदयरोग तज्ज्ञ
औषध विक्रीवर बंदीची मागणी
शहरी व ग्रामीण भागातील बहुतांशी वैद्यकीय व्यावसायिक रुग्णांना कोणत्याही आजारावर ‘स्टिरॉईड’ हे औषध देतात. या औषधामुळे रुग्णांना काही काळासाठी बरे वाटते. परंतु त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होतात. या औषधामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. हाडांची झिज होते. अशा औषध विक्रीवरही संबंधित विभागाने बंदी घालावी.