पाण्याच्या खड्ड्याने घेतला चिमुरडीचा बळी
By Admin | Updated: April 15, 2015 00:30 IST2015-04-15T00:30:31+5:302015-04-15T00:30:31+5:30
सांगलीतील दुर्घटना : महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पाण्याच्या खड्ड्याने घेतला चिमुरडीचा बळी
सांगली : घराबाहेरील अंगणात नळाच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील त्रिमूर्ती कॉलनीत स्वामी समर्थ मंदिराजवळ मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
अनघा सागर व्हावळ, असे या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली होती. कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने या चिमुरडीचा बळी घेतल्यानंतर महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्रिमूर्ती कॉलनी परिसरात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने प्रत्येकाने घराबाहेर खड्डा खोदून नळाचे पाणी घेतले आहे. शिवाय पाण्याचा साठा करण्यासाठी हौदही तयार करून घेतले आहेत. व्हावळ कुटुंबानेही अडीच ते तीन फुटांचा खड्डा खोदून त्याचाच हौद तयार करून घेतला आहे. मंगळवारी पाणी येणार नसल्याने या कुटुंबाने सोमवारी रात्री हा हौद पाण्याने भरून ठेवला होता. अनघा दुपारी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी घरातील लोकांचे तिच्याकडे लक्ष नव्हते. दुपारी दोन वाजता तिची आई तिला खाऊ देण्यासाठी बाहेर आली; परंतु अनघा अंगणात नव्हती. तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ती त्यांच्याच पाण्याच्या हौदात बुडाल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर व्हावळ कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही.
सांगली-मिरज-कुपवाड शहरांतील अनेक उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने बहुसंख्य कुटुंबांनी घराबाहेर नळाच्या ठिकाणीच खड्डा खोदून पाणी घेण्याचा उपाय शोधला आहे. मंगळवारच्या घटनेने तो उपायच मुळावर आल्याचे स्पष्ट झाले. शिवाय महापालिकेचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)
नागरिक सावध
उपनगरांमध्ये प्रत्येकाच्या घराबाहेर खड्डे आणि पाण्याचे हौद आहेत, मात्र अनेकांच्या हौदावर झाकण नाही. काहीजणांनी पत्र्याचे झाकण केले आहे. अनघाच्या मृत्यूनंतर अनेकजण सावध झाले आहेत. हौदावर जाड फरशीचे झाकण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती.