माझ्या बदनामीसाठी ‘तासगाव’चा बळी
By Admin | Updated: April 17, 2015 00:12 IST2015-04-16T23:42:24+5:302015-04-17T00:12:58+5:30
संजयकाका पाटील : हजारवाडीतील कार्यक्रमात माजी मंत्र्यांवर टीका

माझ्या बदनामीसाठी ‘तासगाव’चा बळी
भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना हे पलूस-तासगाव या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विकासाचे मंदिर होते. मात्र माझी बदनामी करून खच्चीकरण करण्यासाठीच जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांनी तासगाव कारखान्याचा बळी घेतला असल्याची तोफ भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी हजारवाडी (ता. पलूस) येथे डागली. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हा कारखाना चालू करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
भिलवडी व वसगडे जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत जनतेशी थेट संवाद साधण्याच्या हेतूने हजारवाडी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, गणपती जिल्हा संघाने चांगल्या पध्दतीने कारखाना चालविला होता. उसाला वेळोवेळी योग्य दरही दिला. हे सर्व शेतकरी जाणतात. पण माझे राजकीय वर्चस्व वाढू नये, म्हणून भाडोत्री संघटनांना हाताशी धरून, वेगवेगळ्या माध्यमातून माझी नाहक बदनामी करत माझ्या ताब्यातून कारखाना काढून घेऊन या सहकार मंदिराचा बळी घेतला गेला. या षड्यंत्रात मी संपलो नाही. कारण मी कधीच चुकीचे वागलो नाही, पण सामान्य शेतकरी भरडला जात आहे. कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांकडून ऊस नेताना शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. हा कारखाना परत गणपती जिल्हा संघाच्याच ताब्यात येईल.
सरपंच रणजित यादव म्हणाले की, भिलवडी परिसरातील विविध विकासकामे मार्गी लावावीत. हजारवाडीचा केंद्राच्या आदर्श ग्राम योजनेत समावेश करावा.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या भिलवडी रेल्वे स्थानकावर थांबवून दोन्ही तालुक्यातील प्रवाशांची सोय करावी.
यावेळी पलूस पंचायत समितीचे सभापती विजय कांबळे, अजित जाधव, अमोल पाटील, वसगडेचे सरपंच अनिल पाटील, रमेश पाटील, खंडोबाचीवाडीचे सरपंच धोंडीराम शिंदे, बुरूंगवाडीचे सरपंच संजय माळी, बबन यादव, सर्जेराव यादव, संजय यादव, बाबूराव तोडकर, महेश जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)