टेंभू योजनेच्या पाण्यात आटपाडीकरांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 00:49 IST2016-06-19T00:49:57+5:302016-06-19T00:49:57+5:30
पाण्याचा परवाना नाही : राजकारणात शेतकऱ्यांचे हाल

टेंभू योजनेच्या पाण्यात आटपाडीकरांचा बळी
अविनाश बाड आटपाडी
टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात येऊन दोन वर्षे झाली, पण या पाण्याचे कसलेही नियोजन नसल्याने आटपाडीकरांवर या पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. ही योजना होण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ज्या आटपाडीत गेली २१ वर्षे पाणी परिषद होत आहे; त्याच आटपाडीकरांना वगळून या योजनेच्या पाणी उपसा करण्याचे परवाने दिले जात आहेत. राजकारण्यांच्या जिरवाजिरवीत निष्पाप आटपाडीकरांचा बळी दिला असल्याची खंत व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले, लोक आनंदले, ‘कृष्णामाई आली हो अंगणी’ म्हणत आता दुष्काळ संपेल असे वाटत असतानाच, दोन वर्षे झाली तरी या पाण्याचा तालुकावासीयांना फारसा उपयोग झालेला नाही. टेंभूचे पाणी सध्या फक्त तलावात येते. या तलावातील पाणी उपसा करण्याचे ज्या शेतकऱ्यांना पूर्वी परवाने आहेत, त्यांनाच याचा लाभ होतो. या पाण्याचा उचल परवाना मिळावा, यासाठी पाटबंधारे कार्यालयात शेतकरी हेलपाटे मारत असतात. वास्तविक सांगोला आणि कडेपूर तालुक्यातील याच योजनेच्या पाण्याचे उचल परवाने पाटबंधारे विभागाने दिले आहेत. त्यामुळे या योजनेच्या वीजबिलासाठी ते शेतकरी खुशीने पैसे देत आहेत. आटपाडी तालुक्यात मात्र परवानेच नसल्याने शेतकरी कसे आणि कशासाठी पैसे देणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे आटपाडीतून शेतकरी पैसे भरत नाहीत, ही केवळ तालुक्याची अकारण बदनामी करणारा आणि दुष्काळाला टक्कर देऊन मानाने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान करणारा खोटा प्रचार आहे.
यावर्षी सांगोला तालुक्यातील ३६५ शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले तर, परवाने नसूनही माणगंगा साखर कारखान्यासह शेतकऱ्यांनी ५७ लाख ५७ हजार रुपये भरले. सांगोला तालुक्याला या योजनेचे १२० दिवस पाणी सुरू होते. आटपाडी तालुक्यात मात्र फक्त २० दिवस दिले गेले. आमदार अनिल बाबर यांनी २५१ द. ल. घ. फूट पाणी आटपाडी तालुक्यात सोडले असल्याचा दावा केला आहे, तर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाचे पत्र दाखवून आटपाडी तालुक्यात फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन अन्याय केल्याचे नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात जाहीरपणे सांगितले.
गेल्या १५ दिवसांपासून राजेंद्रअण्णा देशमुख, आ. अनिल बाबर आणि अमरसिंह देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फै री झडत आहेत. राजेंद्रअण्णांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर आ. अनिल बाबर यांचे नाव न घेता त्यांनीच आडकाठी आणल्याचा आरोप केला. त्याला आ. बाबर यांनी आकडेवारी सांगून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता पुन्हा आ. बाबर यांच्यावर शेतकरी मेळाव्यात सडकून टीका करण्यात आली. अमरसिंह देशमुख यांनी तर बाबर हे टेंभूचे जनक नाहीत. त्यांचा या योजनेशी संबंधच नसल्याचे त्यांचे नाव घेऊन वक्तव्य केले. या दुष्काळी भागाचा कायापालट करण्याची क्षमता असलेली आणि शासनाने हजारो कोटींचा खर्च करून निर्माण केलेली अशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून टेंभूची ओळख आहे. आता शेतकरी आधी पैसे भरायला तयार असूनही पाणी दिले जात नसेल आणि त्यात राजकारण येत असेल तर आणखी किती दिवस आटपाडीकर जनता हा अन्याय सहन करणार, हा खरा प्रश्न आहे.