शिराळा तालुक्यातील व्हेंटिलेटर्स तंत्रज्ञानाअभावी वापराविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:54+5:302021-04-04T04:27:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय अशा दोन इमारती सुमारे ...

शिराळा तालुक्यातील व्हेंटिलेटर्स तंत्रज्ञानाअभावी वापराविना पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय अशा दोन इमारती सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभ्या राहिल्या. या ठिकाणी १८ व्हेंटिलेटर आहेत. मात्र तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने ते धूळ खात पडले आहेत. सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर आता तरी वापरात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
शिराळा व काेकरूड या दोन्ही ठिकाणी राज्यात आदर्शवत अशा इमारती उभ्या राहिल्या. शिराळासाठी १० व कोकरूड साठी ५ असे १५ व्हेंटिलेटरही या ठिकाणी आले होते. मात्र या ठिकाणी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी नाहीत. त्यामुळे हे सर्व व्हेंटिलेटर मिरज येथील कोविड रुग्णालयात नेण्यात आले होते. नंतर रुग्णसंख्या वाढल्याने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात १३, तर कोकरूड ग्रामीण रुग्णालयात ५ असे १८ व्हेंटिलेटर आणण्यात आले. आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा येथे ६ केपीएल क्षमतेचा ऑक्सिजन टॅंक, ड्युरा सिलिंडर बसविले आहेत. येथे ७५ ऑक्सिजन बेड आहेत तसेच व्हेंटिलेटरची जोडणी केली आहे.
इस्लामपूर, सांगली, मिरज येथे रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. जरी झाली तरी त्यास आठ-दहा तास वाट पाहत बाहेर थांबावे लागले होते. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही प्रकार घडले. दोन दिवसापूर्वीही एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णास व्हेंटिलेटरची गरज पडली. मात्र ते येथे उपलब्ध न झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागली.
तालुक्यातील खासगी अथवा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नसल्याने रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. एकीकडे शासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत, मात्र व्हेंटिलेटर व त्यासाठी लागणाऱ्या डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करून पगार देऊ शकत नाही का ? दोन्ही रुग्णालयांत व्हेंटिलेटरला लागणाऱ्या आवश्यक वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.