सांगलीत ३२ कोटींची वाहन विक्री

By Admin | Updated: March 22, 2015 00:23 IST2015-03-22T00:23:44+5:302015-03-22T00:23:44+5:30

गुढीपाडव्याचा मुहूर्त : आणखी ३७०० नवी वाहने रस्त्यावर, दहा टक्के वाढ

Vehicles worth Rs 32 crore in Sangli | सांगलीत ३२ कोटींची वाहन विक्री

सांगलीत ३२ कोटींची वाहन विक्री

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज (शनिवार) सांगलीतील वाहन शोरूममधून तब्बल ३२ कोटी ७१ लाखांची वाहन विक्री झाली. गतवर्षाची तुलना केल्यास जवळपास दहा टक्क्यांनी वाहन विक्री वाढली असल्याचे वाहन वितरकांनी सांगितले. आजच्या विक्रीने ३७०० नवी वाहने रस्त्यावर आली आहेत.
येथील सिध्दिविनायक अ‍ॅटोमोबाईलमधून १०५० दुचाकींची विक्री झाली. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे दहा टक्के विक्रीत वाढ झाल्याची माहिती संचालक श्रीकांत तारळेकर यांनी दिली. सांगलीतील पोरेज शोरूममधून ८३० दुचाकींचे पाडव्याच्या मुहूर्तावर वितरण करण्यात आले. गतवर्षाच्या तुलनेत दहा टक्के विक्री वाढली असल्याचे वितरक अविनाश पोरे यांनी सांगितले. ट्रायकलर होंडा शोरूममधून ४२५ दुचाकींची विक्री झाल्याची माहिती अमित मगदूम यांनी दिली. येथील मिलेनियम होंडा, घाटगे-पाटील शोरूम येथून ६६० दुचाकी, त्याचबरोबर इतर ठिकाणांहूनही ३५० दुचाकींची विक्री झाली. सांगलीतून सुमारे ३५०० दुचाकींची आज विक्री झाली.
मोटार वितरणासाठीही पाडव्याचा मुहूर्त चांगला ठरला आहे. शहरातील तीन शोरूममधून २७३ मोटारी वितरित करण्यात आल्या. येथील पंडित अ‍ॅटोमोबाईलमधून १०० मोटारी वितरित झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत मागणी स्थिर होती, अशी माहिती विक्री व्यवस्थापक एस. व्ही. जोशी यांनी दिली. चौगुले इंडस्ट्रीजमधून १७३ मोटारी पाडव्याच्या मुहूर्तावर वितरित झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत तब्बल तीस टक्के वाहन विक्री वाढल्याची माहिती वरिष्ठ विक्री व्यवस्थापक निलेश पोतदार यांनी दिली.
शहरातील तीन शोरूममधून ६१ ट्रॅक्टरचीही विक्री झाली. स्वप्नपूर्ती मोटर्समधून २२ ट्रॅक्टरची विक्री झाल्याची माहिती सुभाष फुलारी यांनी दिली. समर्थ ट्रॅक्टर्समधून २२ ट्रॅक्टर गेल्याची माहिती राजेंद्र गुरव यांनी दिली. णमो ट्रॅक्टर्समधून १७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली. सांगलीतून १६ कोटी ६२ लाखांची दुचाकी, २ कोटी ४४ लाखांचे ट्रॅक्टर, तर १३ कोटी ६५ लाखांची मोटार विक्री झाली. (प्रतिनिधी)
अवकाळीचा ट्रॅक्टर विक्रीला फटका
दुचाकी व मोटार विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी ट्रॅक्टर विक्रीला मात्र फटका बसला आहे. यंदा ट्रॅक्टर विक्रीला सुमारे पंधरा टक्के फटका बसल्याची माहिती ट्रॅक्टर विक्रेते जयकुमार बाफना यांनी दिली. अवकाळी पावसाचा फटका, उसाचे बिल थकित आदी कारणांमुळे ट्रॅक्टर विक्रीवर परिणाम झाला. यावर्षी बागकामासाठी लागणाऱ्या लहान ट्रॅक्टरनाच मागणी अधिक होती.


 

Web Title: Vehicles worth Rs 32 crore in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.