आठवडा बाजार बंदमुळे भाजीपाला महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:51+5:302021-04-05T04:22:51+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झाला आहे. बाजारपेठेला उन्हाळ्याचीही चाहुल ...

आठवडा बाजार बंदमुळे भाजीपाला महागला
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झाला आहे. बाजारपेठेला उन्हाळ्याचीही चाहुल लागल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. या आठवड्यात खाद्यतेलांची दरवाढ कायमच होती. सुर्यफूल आणि सोयाबीन तेलात वाढ झाली आहे. फळांच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. आंब्याची आवक मात्र काही प्रमाणात सुरळीत होत आहे.
भाजीपाल्याची आवक थंडावल्याने व त्यात व्यापाऱ्यांना विक्रीसाठी बाजार बंद असल्याने फिरून किंवा एकाठिकाणी विक्री होत असली तरी त्यातही मर्यादा येत आहेत. किराणा मालाच्या दरातील वाढ ग्राहकांना अडचणीची ठरत आहे. त्यातही खाद्यतेलाचे दर वाढल्याने महिन्याचे बजेट सांभाळताना गृहिणींची कसरत होत आहे.
या आठवड्यात कलिंगड, टरबूज आणि आंब्याची चांगली आवक सुरू आहे. संत्र्यासह सफरचंदाची आवक कमी झाली आहे. आंब्याला ग्राहकांकडूनही मागणी आहे.
चौकट
तेलदराचा पुन्हा भडका
खाद्यतेलाच्या दरातील वाढ गेल्या तीन महिन्यांपासून कायम आहे. आठवड्याला सरासरी १५ ते ३० रूपयांनी वाढ होत आहे. स्थानिक पातळीवरील कच्च्या मालाची घट आणि इतर भागातूनही तेल येत नसल्याने अजून काही दिवस ही वाढ कायम राहणार आहे.
चौकट
आंब्याची आवक वाढतेय
फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढत आहे. यातही कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याची संख्या जास्त आहे. या आठवड्यापासून कोकणातून जादा आंबा येण्याची शक्यता आहे. कलिंगडाच्या राशीच्या राशी बाजारात दिसून येत आहेत. कलिंगडाची विक्रमी आवक होत असली तरी त्याला मागणीही चांगली आहे.
चाैकट
पालेभाज्यांची आवक कमी
बाजार बंद असल्याने व उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादनही कमी होत असल्याने त्याचा परिणाम होऊन वांगी, दोडका, गवारीच्या दरात सरासरी १५ रूपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात काकडी, शेवग्याची चांगली आवक आहे. लिंबूची मागणी वाढल्याने पाच रूपयांना एक लिंबू मिळत आहे.
काेट
खाद्यतेलाचा दर कधी कमी होणार, हा प्रश्नच आहे. तेलच नव्हे या महिन्यात इतर पदार्थांचेही दर वाढले आहेत. गॅस वाढला त्यात भाज्या महागल्या आणि किराणा मालही महागल्याने अडचणी वाढत आहेत.
- भारती चव्हाण, गृहिणी
कोट
सध्या कर्नाटकातील आंब्याची आवक वाढली आहे. आता कोकणातून आंबा आल्यानंतर अजून ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल. लॉकडाऊनची चर्चा असल्याने आवकेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- राजाराम बने, व्यापारी
कोट
किराणा मालाच्या अनेक पदार्थांचे दर आता स्थिर होत आहेत. खाद्यतेलाचे मात्र दिवसाला दर वाढत आहेत. दररोज दरात वाढच होत असल्याने ग्राहकांना दराबाबत समजावून सांगताना अडचणी येत आहेत. त्यातच मागणीएवढी आवकही दिसून येत नाही.
- अजित शिंदे, व्यापारी