मोटारीने पेट घेतल्याने भाजी विक्रेत्याचा भाजून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:42+5:302021-06-09T04:33:42+5:30
फोटो : ०७०६२०२१एसएएन०१, ०२ : विटा येथे भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असताना अचानक मोटारीला आग लागली. विटा : मोटारीत ...

मोटारीने पेट घेतल्याने भाजी विक्रेत्याचा भाजून मृत्यू
फोटो : ०७०६२०२१एसएएन०१, ०२ : विटा येथे भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असताना अचानक मोटारीला आग लागली.
विटा : मोटारीत भाजीपाला व अन्य किराणा साहित्य भरून विक्रीसाठी घेऊन जात असताना ती सुरू करताच अचानक पेट घेतल्याने रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५०, शाहूनगर, विटा) या भाजी विक्रेत्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.
येथील रघुनाथ ताटे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून, भाजीपाला नेण्यासाठी ते मोटारीचा (क्र. एमएच ०१ व्ही २४०९) वापर करत. सोमवारी पहाटे भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मोटारीत भरून विक्रीसाठी जात होते. त्यांनी घरासमोर मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अचानक मोटारीतील वायरिंगने पेट घेऊन मोठा स्फोट झाला. क्षणार्धात मोटारीत आगीचा भडका झाला. स्टेअरिंगजवळ असल्याने ताटे यांना बाहेर येता आले नाही. नातेवाईक व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. संपूर्ण मोटारीला आतील बाजूने आगीने वेढा दिल्याने ताटे यांचा मोटारीतच भाजून मृत्यू झाला. या घटनेची माहिती नगरसेवक अजित गायकवाड यांनी विटा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक पी.के. कन्हेरे पुढील तपास करीत आहेत.