भाजीपाल्याचे दर स्थिर; फळांची मागणी वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:35+5:302021-01-18T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नवीन वर्षातील पहिलाच मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा झाला असताना, बाजारपेठेवर मात्र, दरवाढीची संक्रांत कोसळली. ...

भाजीपाल्याचे दर स्थिर; फळांची मागणी वाढतेय
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नवीन वर्षातील पहिलाच मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा झाला असताना, बाजारपेठेवर मात्र, दरवाढीची संक्रांत कोसळली. भाजीपाल्याच्या दरात काहीशी वाढ होतानाच किराणा मालाच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम हाेती. गाजराची आवक वाढत चालल्याने बाजारात मागणीही चांगली आहे. सरासरी ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने गाजरे उपलब्ध आहेत. खाद्यतेलाचे दर या आठवड्यात स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मिक्स भाज्यांना मोठी मागणी होती. पातीच्या कांद्यासही चांगली मागणी दिसून आली. पावटा, घेवडा, वाटाण्यास दरही चांगला मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शहरातील सर्वच आठवडाबाजारांत भाज्यांना चांगली मागणी असल्याने दरही वाढले होते.
फळांमध्ये कलिंगड, संत्रीची आवक कायम असल्याने दरही स्थिर आहेत. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत या आठवड्यात फळांना चांगली मागणी असल्याचे दिसून आले. या आठवड्यातील दिलासादायक बाब म्हणजे खाद्यतेलाचे दर स्थिर होते. यात घट होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
किराणा दरात वाढ
या आठवड्यात सरकी, सूर्यफुल तेलांच्या दरात वाढ झाली नसली तरी इतर साहित्यात वाढ झाली. त्यातही कडधान्यांच्या दरात सरासरी १५ रुपयांनी वाढ झाली. गव्हाच्या दरात वाढ झाली असली तरी चांगल्या दर्जाचा गहू येत आहे. ज्वारीचे दर ४० ते ४५ रुपयांवर असून बार्शी ज्वारीला जादा मागणी आहे. संक्रांतीमुळे बाजरीलाही चांगली मागणी होती.
चाैकट
फळांच्या राशी
गेल्या महिन्याच्या तुलनेत या आठवड्यात फळांची आवक चांगली होत आहे. त्यातही कलिंगड, संत्रीची आवक फळ मार्केटमध्ये जादा आहे. परदेशी फळांपेक्षा देशी फळांना मागणी चांगली आहे. नारळाएवढ्या आकाराच्या पेरूचीही आवक चांगली आहे.
चौकट
फळभाज्यांना मागणी
या आठवड्यात वांगी, दोडका, भोपळ्यासह इतर फळभाज्यांना चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात पातीचा कांदाही उपलब्ध झाला असला तरी अजूनही कोवळा कांदा असल्याने संक्रांतीपुरतीच मागणी होती. मेथीच्या दरात वाढ झाली असली तरी आठवडाबाजारात भाज्यांचे ढीग दिसून येत आहेत.