भाजीबाजाराची समस्या कायम
By Admin | Updated: May 25, 2015 00:18 IST2015-05-24T23:59:46+5:302015-05-25T00:18:43+5:30
मिरजेत रस्त्यावरील प्रकार : पर्यायी मंडईअभावी विक्रेते रस्त्यावरच

भाजीबाजाराची समस्या कायम
मिरज : मिरजेत रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांची कायमस्वरूपी भाजीमंडईची मागणी तीन दशके प्रलंबित असल्याने विक्रेत्यांनी रस्त्यांवरच ठाण मांडले आहे. रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून, विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना नसल्याने ही समस्या अधिकाधिक गुंतागुंतीची बनली आहे.
मिरजेची संस्थानकालीन भाजीमंडई अपुरी असल्याने विक्रेत्यांनी मार्केट परिसरातील रस्ते व्यापले आहेत. मार्केट परिसरात अरूंद रस्त्यावर विक्रेते, हातगाडी चालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. लोणी बाजार परिसरात रस्त्यावरील विक्रेत्यांना न्यायालयाने मनाई केली आहे; मात्र मनाई आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर भाजीबाजार सुरूच आहे. कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेकडोवेळा हटविलेला भाजीबाजार पुन्हा रस्त्यावरच आहे. भाजीविक्रेत्यांसाठी बाजार समितीच्या आवारात पर्यायी भाजीबाजाराची व्यवस्था व शहरात आठ ठिकाणी आठवडा बाजाराची व्यवस्था करण्यात आली. पर्यायी भाजी बाजार व आठवडा बाजार सुरू आहेत, मात्र मार्केट, लोणी बाजार, दत्त चौक परिसरात रस्त्यावरील बाजाराची समस्या कायम आहे.
भाजी मंडईसाठी पालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर भाजीमंडई बांधण्यास विक्रेत्यांचा विरोध आहे. खंदकात भाजीमंडईची विक्रेत्यांची मागणी आहे. खंदकाच्या खासगी जागेच्या भूसंपादनासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले. मात्र गेल्या दहा वर्षांत खंदकाच्या जागेच्या भूसंपादनाचे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत. रस्त्यावरील भाजीबाजाराचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याने न्यायालयाने महापालिका व पोलिसांना अवैध भाजीबाजार हटविण्याचे आदेश दिले आहेत, मात्र त्यानंतरही महापालिकेने बाजार हटविण्यासाठी किरकोळ व जुजबी कारवाई केली आहे.
भाजीबाजाराचा वाद न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येते. काही काळानंतर भाजीविक्रेते पुन्हा मूळ ठिकाणी येतात. हे आता सर्वांनाच सवयीचे झाले आहे. कायमस्वरुपी भाजी मंडईची व्यवस्था केल्याशिवाय हा प्रश्न सुटणे कठीण आहे. मात्र त्याऐवजी वरवरचे उपाय सुरू आहेत.
खंदकाच्या जागेत नवीन भाजीमंडईची उभारणी प्रलंबित असल्याने रस्त्यावरील भाजीविके्रत्यांची समस्या गुंतागुंतीची झाली आहे. (वार्ताहर)
आक्रमक विक्रेते
भाजीबाजार हटविण्यास जाणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात येतात. भाजी विक्रेत्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही चोप दिला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना हटविण्याबाबत महापालिका व पोलिसांकडून परस्परावर जबाबदारी ढकलण्यात येत आहे. भाजीबाजार हटविल्याच्या कारणावरून विक्रेत्यांनी तत्कालीन नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयात घुसून चोप दिला होता. न्यायालयाने भाजीबाजाराविरुध्द आदेश दिल्यानंतर न्यायालयात गेलेल्या काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती.