इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतर वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:51+5:302021-02-06T04:48:51+5:30
इस्लामपूर : येथील जुनी गणेश भाजी मंडईमध्ये वर्षानुवर्षांपासून भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना डांगे चौकातील नवीन छत्रपती शिवाजी ...

इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतर वादात
इस्लामपूर : येथील जुनी गणेश भाजी मंडईमध्ये वर्षानुवर्षांपासून भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना डांगे चौकातील नवीन छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील स्थलांतरित करण्याच्या पालिका प्रशासनाच्या जबरदस्तीला झुगारून देत भाजीपाला विक्रेत्यांनी पालिकेत धडक मारली. तेथे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन देऊन स्थलांतर न करण्याबाबत चर्चा झाली.
गणेश भाजी मंडईमध्ये गेल्या ५० ते ६० वर्षांपासून शहरासह तालुक्यातील भाजीपाला पिकविणारे शेतकरी व छोटे व्यापारी यांची सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बाजार भरत असतो. कित्येक शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांची या मंडईत होणाऱ्या उलाढालीवरच उपजीविका सुरू असते. या परिसरात होणारी नागरिकांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी डांगे चौकातील नव्या भाजी मंडईत या व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्याचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे.
डांगे चौकातील नव्या भाजी मंडईत भाजीपाला विक्रेते आणि छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी बसविले होते. मात्र, तेथे ग्राहकच न फिरकल्याने या छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे हे व्यापारी पुन्हा गणेश भाजी मंडईत व्यवसायासाठी आले. मात्र, आज सकाळी पालिका प्रशासनाने या व्यापाऱ्यांवर दंडेली करत त्यांना नव्या भाजी मंडईत पिटाळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला भाजीपाला विक्रेते आणि छोट्या व्यापाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने शाकीर तांबोळी, महाडिक युवा शक्तीचे कपिल ओसवाल, मन्सूर वाठारकर, सोमनाथ फल्ले यांनी या सर्व छोट्या व्यापाऱ्यांना एकत्र करून पालिकेत आणले. त्याठिकाणी मुख्याधिकारी माळी यांना निवेदन देऊन गणेश भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना स्थलांतरित न करता नव्या भाजी मंडईसाठी वेगळी उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
यावेळी सुनीता देसाई, प्रियंका झेंडे, दिलावर शेख, अभिषेक कानू, रफिक मणेर, समीर तांबोळी, मौल्ला नदाफ, झाकीर नदाफ, अस्लम तांबोळी व इतर व्यापारी उपस्थित होते.
फोटो - ०५०२२०२१-आयएसएलएम- भाजी मंडई न्यूज
इस्लामपूर येथील जुनी गणेश भाजी मंडई येथील छोट्या व्यापाऱ्यांनी नव्या मंडईतील जाण्यास विरोध असणारे निवेदन मुख्याधिकारी अरविंद माळी यांना दिले.