वसंतदादा घराण्याला पुन्हा लागले वादाचे ग्रहण...

By Admin | Updated: September 2, 2014 23:54 IST2014-09-02T23:54:34+5:302014-09-02T23:54:34+5:30

विधानसभा निवडणूक : स्वकीयांच्या आरोपामुळे सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था; नेत्यांनीही पाळले मौन

Vasantdada's family resumes clash | वसंतदादा घराण्याला पुन्हा लागले वादाचे ग्रहण...

वसंतदादा घराण्याला पुन्हा लागले वादाचे ग्रहण...

अविनाश कोळी, सांगली : लोकसभेप्रमाणेच वसंतदादा घराण्याला विधानसभा निवडणुकीतही वादाचे ग्रहण लागले आहे. दादा घराण्यातील वादाचे चित्र किती खरे आणि किती खोटे याच्या खोलात कुणीही शिरले नसले तरी, या वादाचे पडसाद आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उमटत आहेत. यातच काँग्रेसच्याच काही लोकांनी दादा घराण्याविरोधात रणशिंग फुंकल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संभ्रमावस्थेत भर पडली आहे.
लोकसभा निवडणुकीत सुरुवातीच्या टप्प्यात माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या प्रचारात मदन पाटील यांचा सहभाग नव्हता. दादा घराण्यातील हा वादाचाच भाग होता, अशी चर्चा त्यावेळी झाली. मात्र काँग्रेसच्या प्रचार प्रारंभावेळी मदन पाटील यांनी हजेरी लावल्यानंतर या गोष्टीवर पडदा पडला. तरीही या दोन्ही बंधूंमध्ये छुपा संघर्ष सुरू असल्याच्या चर्चेस ऊत आला. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मदन पाटील यांचे समर्थक सुभाष खोत यांनी दादा घराण्यातील वादावर उघडपणे टीका केली होती. गत विधानसभा निवडणुकीत संभाजी पवारांना प्रतीक पाटील गटाचा छुपा पाठिंबा होता, असे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले होते. आता पुन्हा त्याच गोष्टींची चर्चा विधानसभेच्या निमित्ताने सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियावरून संभाजी पवारांसोबतचे प्रतीक पाटील यांचे छायाचित्र शहरभर फिरले. त्यातूनही दादा घराण्यातील वादाचा प्रसार करण्यात आला होता. अर्थात या सर्व गोष्टींमागे काँग्रेसचीच मंडळी आहेत. मदन पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यात दुरावा असल्याचे चित्र आजही तसेच आहे. पूर्वी या वादाची खासगीत चर्चा होत होती. आता उघडपणे या विषयावर चर्चा व टीका केली जात आहे. मदन पाटील यांचे समर्थक मानले जाणारे पप्पू डोंगरे आता त्यांच्याच विरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत, तर प्रकाशबापू यांचे समर्थक मानले जाणारे दिगंबर जाधवही मदन पाटील यांच्याविरोधात टीका करीत आहेत. त्यामुळे दादा घराण्यामधील तथाकथित वादाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. विधानसभेसाठी विशाल पाटील यांच्या नावाचा आग्रह प्रदेश कार्यकारिणीकडे धरल्याची चर्चा सुरू झाली. मात्र याचा प्रतीक पाटील यांनी इन्कार केला आहे.

हा विघ्नसंतुष्टांचा खेळ : प्रतीक पाटील
या चर्चेबद्दल प्रतीक पाटील म्हणाले की, हा सर्व विघ्नसंतुष्ट लोकांचा खेळ आहे. आमचेच काही लोक पक्षाची व नेत्यांची बदनामी करीत आहेत. वसंतदादा घराण्यात कोणताही वाद नाही. प्रदेश काँग्रेसकडे आम्ही विशाल पाटील यांच्याबाबत आग्रह धरलेला नाही. मदन पाटील जर निवडणूक लढविणार नसते, तर विशाल पाटील यांचा विचार झाला असता. प्रत्यक्षात अशी कोणतीही परिस्थिती नाही. मीही स्वत: विधानसभेसाठी इच्छुक नाही. लोकसभा निवडणुकीत सुभाष खोत यांनी अशीच चुकीची चर्चा केली. त्यानंतर आता दिगंबर जाधव यांच्याकडून अपप्रचार सुरू आहे. पप्पू डोंगरे यांनीही लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपचा प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसमधील काही लोकांकडूनच वसंतदादा घराण्यात वाद असल्याची चर्चा पेरली जात आहे. यात कोणतेही तथ्य नाही, मात्र यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Web Title: Vasantdada's family resumes clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.