‘वसंतदादा’ची ऊसतोड रोखली
By Admin | Updated: October 15, 2015 00:27 IST2015-10-14T23:10:36+5:302015-10-15T00:27:55+5:30
गळिताच्या प्रारंभीच खळबळ : ब्रह्मनाळ येथे ‘स्वाभिमानी’चा दणका

‘वसंतदादा’ची ऊसतोड रोखली
भिलवडी : एफआरपीनुसार उसाला हमीभाव जाहीर न करता ऊसतोड सुरू करणाऱ्या सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे सुरू केलेली ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्त्यांनी बंद पाडली.बुधवारी सकाळी सांगली येथे वसंतदादा कारखान्याने गळिताचा प्रारंभ केला. मात्र याचदिवशी स्वाभिमानीने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व पलूस तालुका पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी वसंतदादा कारखान्याने गेल्या दोन गळित हंगामातील शेतकऱ्यांची थकित ऊसबिले दिल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटवून देणार नसल्याचा इशारा दिला होता. यावेळी वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, भिलवडी, अंकलखोप आदी गावातील शेतकऱ्यांचे कारखाना प्रशासन कोट्यवधी रुपयांची देणीबाकी आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी कारखाना प्रशासनाने यंदाच्या हंगामापुरते सहकार्य करा, आम्ही मागची बिले देतो, असे आश्वासनही दिले होते.मात्र बुधवारी कारखान्याच्या गळित हंगामाचा प्रारंभ सुरू करीत असतानाच प्रशासनाला शेतकऱ्यांची बिले देण्याचा विसर पडला. पलूस तालुक्यात कारखान्याने ब्रह्मनाळ येथे ऊसतोड सुरू केली. एका शेतकऱ्यास कारखान्याचे कर्मचारी व ऊस वाहतूकदारांनी ‘तुम्ही आम्हास आता सहकार्य करा, आम्ही एफआरपीनुसार तुम्हाला दर देतो,’ असे सांगून बुधवारी सकाळी ऊसतोड सुरू केली. ही माहिती स्वाभिमानीच्या संदीप राजोबा यांना समजताच त्यांनी शेतात समक्ष जाऊन ऊसतोड रोखली. (वार्ताहर)
बिल द्या : अन्यथा कांडेही देणार नाही...
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या दोन हंगामापासून ऊसबिले थकित आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे. कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांची गेल्या दोन गळीत हंगामातील थकित बिले दिल्याशिवाय वसंतदादा कारखान्याला उसाचे कांडेही देणार नसल्याचा इशारा संदीप राजोबा यांनी दिला आहे.