वसंतदादा जन्मशताब्दी महोत्सव उद्यापासून
By Admin | Updated: November 11, 2016 23:43 IST2016-11-11T23:43:57+5:302016-11-11T23:43:57+5:30
जय्यत तयारी : प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

वसंतदादा जन्मशताब्दी महोत्सव उद्यापासून
सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉँग्रेसतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी १० वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते स्फूर्तिस्थळी अभिवादनाच्या कार्यक्रमाने होईल, अशी माहिती जन्मशताब्दी वर्ष समारोह समितीचे सदस्य यशवंत हाप्पे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
याप्रसंगी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, कॉँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील (निलंगेकर), विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माजी सभापती शिवाजीराव देशमुख, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
जन्मशताब्दीनिमित्त राज्यभरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सहकारविषयक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वसंतदादांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, स्वातंत्र्यानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य नव्या पिढीला समजावेत, यासाठी कार्यक्रमांचे नियोजन केले जात
आहे.
नागपूर, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी वर्षभर कार्यक्रम होतील. जन्मशताब्दी महोत्सवाची सांगता सांगलीत होणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात येईल. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करता आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवधुत गुप्तेंचा कार्यक्रम
वसंतदादा जन्मशताब्दीनिमित्त उद्या, रविवारी, सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदीकाठावरील तरंगत्या व्यासपीठावर संगीतकार अवधुत गुप्ते यांचा ‘संगीतरजनी’ हा कार्यक्रम होणार आहे. १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान बालमहोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, त्यात चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा होतील, असे समितीतर्फे सांगण्यात आले.