वसंतदादा शेतकरी बँकेची स्थगिती दोघांपुरतीच
By Admin | Updated: October 8, 2015 00:59 IST2015-10-07T23:10:49+5:302015-10-08T00:59:47+5:30
चौकशी सुरूच : पुढील सुनावणी १६ आॅक्टोबर रोजी; चौकशी अधिकाऱ्यांसमोर १०५ जणांचे म्हणणे सादर

वसंतदादा शेतकरी बँकेची स्थगिती दोघांपुरतीच
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी बुधवारी सुनावणीची प्रक्रिया पार पाडली. सहकार विभागाने दिलेली स्थगिती ही केवळ दोघा याचिकाकर्त्यांपुरतीच असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यामुळे कलम ७२ (२) ची चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. चौकशी अधिकाऱ्यांसमोर आजअखेर १०५ जणांनी म्हणणे सादर केले आहे. दोघांचे म्हणणे अद्याप सादर व्हायचे आहे. दोन मृत संचालकांचे वारसदार शोधून त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यांना सुनावणीची शेवटची संधी देण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात युक्तिवादास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. युक्तिवाद संपल्यानंतर आरोपपत्राची तयारी चौकशी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. चौकशीचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाच तत्कालीन सरव्यवस्थापक माधव गोगटे आणि मनोहर कावेरी यांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या काही आदेशांविरोधात सहकारमंत्र्यांकडे अपील केले. कायद्यातील तरतुदीनुसार ज्यांना आरोपी केले आहे, अशा सर्वांना चौकशीसंदर्भातील सर्व प्रकारची कागदपत्रे मोफत मिळायला हवीत. मात्र चौकशी अधिकारी यासाठी पैसे भरून घेत आहेत. याशिवाय बाहेर ५0 पैसे प्रति प्रत दर असताना, चौकशी अधिकारी १ रुपया दर आकारत आहेत, असे आक्षेप नोंदविण्यात आले. याशिवाय कोणत्याही निर्णयप्रक्रियेत नसलेल्या बँक कर्मचाऱ्यांना कोणत्याही घोटाळ्यात आरोपी करता येत नाही, असा एक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा दाखलाही सहकारमंत्र्यांसमोरील सुनावणीवेळी देण्यात आला होता. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली होती.विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, पुन्हा अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पुढील सुनावणी २८ रोजी
दोघा माजी अधिकाऱ्यांनी सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर चौकशी अधिकाऱ्यांच्या आदेशांना व दोघांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणी सहकारमंत्र्यांच्या दालनात २८ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.