वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर द्या
By Admin | Updated: September 17, 2014 23:04 IST2014-09-17T22:57:23+5:302014-09-17T23:04:16+5:30
थकित देणी द्या : कामगार युनियन सभेत ठराव; नियोजनशून्य कारभारामुळे डबघाई

वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर द्या
सांगली : आजपर्यंतच्या संचालक मंडळाच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभारामुळेच कारखाना डबघाईला आला असून, आता चांगल्या कारभारासाठी वसंतदादा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी द्या, असा ठराव आज (बुधवार) येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगार युनियनच्या (इंटक) वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी इंटकचे अध्यक्ष श्रीकांत देसाई होते.
येथील साखर कामगार भवनमध्ये ही सभा झाली. यावेळी कार्याध्यक्ष घन:शाम पाटील, विकास पाटील, पतंगराव मुळीक आदी उपस्थित होते. अध्यक्ष देसाई यांनी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा, असा ठराव मांडला. याला सर्व कामगारांनी टाळ्या व घोषणा देऊन मंजुरी दिली. यावेळी देसाई म्हणाले की, मदन पाटील, प्रतीक पाटील व त्यानंतर विशाल पाटील यांनी पारदर्शीपणे कधीच कारखाना चालवला नाही. योग्य नियोजनाच्या अभावामुळेच कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे. यावर्षी कारखाना सुरू होतो किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. संचालक मंडळाने याबाबत कोणतेही नियोजन केलेले दिसत नाहीत.
वसंतदादांनी उभे केलेले हे मंदिर चालले पाहिजे, हीच प्रत्येक कामगारांची इच्छा आहे. कामगार सध्या हलाखीचे जीवन जगत आहे, मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. कारखाना चालला नाही, तर कामगारांची चूल पेटणार नाही, मात्र संचालक, सभासदांचे काहीही बिघडणार नाही.
कारखाना तुम्हाला व्यवस्थित चालवता येत नसेल, तर तो थर्ड पार्टीला (भाडेतत्त्वावर) चालवण्यास द्यावा. कामगार काम करण्यासाठीच आहे, मात्र त्याचा थकित पगार आधी दिला पाहिजे. गेल्या दहा वर्षांपासून कामगारांची थकित देणी मिळवण्यासाठीच युनियन प्रयत्न करीत आहेत. कारखाना अध्यक्षांकडून कामगारांमध्ये दिशाभूल करण्याचेच प्रयत्न आहेत. अशावेळी त्यांनी एकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष घन:शाम पाटील म्हणाले की, व्यवस्थापनानेच कामगारांना देशोधाडीला लावले आहे. कामगारांत भांडणे लावण्याचे उद्योग सुरू आहे. उच्च न्यायालयाने कामगारांची थकित देणी देण्याचा आदेश देऊन तो पाळला गेला
नाही.
यावेळी कामगारांनी थकित पगार दिल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, अशी मागणी युनियनकडे केली. स्वागत पतंगराव मुळीक यांनी केले. यावेळी प्रदीप शिंदे, अशोक साळुंखे, रमेश पाटील, शिवाजी पाटील, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५
आर. बी. शिंदेंची अनुपस्थिती
कामगार नेते आर. बी. शिंदे यांच्या अनुपस्थितीत कामगार युनियनची ही सभा होती. सभेपूर्वी त्यांना आदरांजली अर्पण करून सभेला प्रारंभ करण्यात आला. त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कामगार युनियनची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन अध्यक्ष श्रीकांत देसाई यांनी केले.