वसंतदादा कारखान्यासाठी २२ टक्के मतदान
By Admin | Updated: May 23, 2016 00:19 IST2016-05-22T22:48:40+5:302016-05-23T00:19:56+5:30
कारखाना सभासदांमध्ये निरुत्साह : केंद्रे पडली ओस, आजपर्यंतच्या नीच्चांकी मतदानाची नोंद

वसंतदादा कारखान्यासाठी २२ टक्के मतदान
सांगली : केवळ सहा जागांसाठीच झालेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानादिवशी रविवारी सभासदांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसून आला. एकूण २२.१७ टक्के एवढे आजवरचे सर्वात कमी मतदान नोंदले गेले. उद्या (सोमवारी) मिरजेतील शेतकरी भवनात मतमोजणी होणार आहे.
संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तीन गटांमध्ये तीन अतिरिक्त उमेदवारांचे अर्ज असल्याने सहा जागांसाठी निवडणूक झाली. सांगली व अनुसूचित जाती जमाती गटात ज्या उमेदवारांचे अर्ज राहिले होते, त्यांनी पुन्हा सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे या निवडणुकीत केवळ औपचारिकता राहिली होती. त्यामुळे सभासदांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. वसंतदादा कारखान्याची सध्याची मतदारसंख्या ३५ हजार २३९ इतकी आहे. सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या चार गटातील सभासदांची संख्या ३५ हजार १००, व्यक्ती सभासद ४२ आणि संस्था सभासद ९७ अशांचा समावेश आहे.
मतदानादिवशी सकाळपासूनच केंद्रांवर शांतता होती. सकाळी ८ ते दुपारी ४ अशी मतदानाची वेळ होती. सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ ३ टक्के मतदान नोंदले गेले. दुपारी १२ वाजेपर्यंत १०.७३ टक्के, २ वाजेपर्यंत १६.७७ टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत २२.१७ टक्के मतदान झाले. एकूण ३५ हजार १०० मतदारांपैकी केवळ ७ हजार ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सर्वाधिक मतदान सांगलीतील आठ केंद्रांवर झाले. याठिकाणी २९.६१ टक्के एकूण मतदान झाले. कारखाना कार्यक्षेत्रात सर्वात कमी मतदान तासगावमध्ये केवळ १६.३६ टक्के नोंदले गेले. मिरजेतही १६.७८ टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसून आला. अनेक केंद्रे ओस पडली होती. (प्रतिनिधी)
विलासराव शिंदेंसह अनेकांना बाहेर काढले
मतदान करण्यासाठी सहा प्रकारच्या ओळखपत्रांची अट घालण्यात आली होती. यामध्ये कारखान्याच्या सभासद ओळखपत्राचा समावेश नव्हता. त्यामुळे आष्टा येथील केंद्रात विलासराव शिंदे, सांगलीवाडीचे नगरसेवक पांडुरंग भिसे यांच्यासह दोघांना मतदान करण्यास मज्जाव केला. केंद्रांपासून मतदारांचे घर लांब असल्याने अशा अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. सांगली केंद्रावरही असा अनुभव अनेकांना आला.
मतमोजणी आज
मिरजेतील मार्केट यार्डमधील शेतकरी भवनात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. २० टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याठिकाणी २५० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
सांगलीत वसंतदादा कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रा. शरद पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.