वसंतदादा कारखाना निवडणूक; छाननी प्रक्रियेवर आज फैसला
By Admin | Updated: May 9, 2016 00:36 IST2016-05-08T23:51:52+5:302016-05-09T00:36:43+5:30
सर्वांचे लक्ष : सहसंचालकांच्या निर्णयावर उमेदवारीचे भवितव्य

वसंतदादा कारखाना निवडणूक; छाननी प्रक्रियेवर आज फैसला
सांगली : वसंतदादा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत छाननी प्रक्रियेविरोधात दाखल झालेल्या अपिलावर उद्या सोमवारी प्रोदशिक साखर सहसंचालक सचिन रावल निर्णय घेणार आहेत. या निर्णयावर निवडणुकीतील राजकीय गणित अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर गत शुक्रवारी सुनावणी झाली. कारखान्याच्या निवडणुकीअंतर्गत छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झालेल्या एकूण पाचजणांनी त्यांच्याकडे अपील केले आहे. यापैकी बुधगावचे अनिल डुबल, निंबळक (ता. तासगाव) येथील दिनकर पाटील, सांगलीवाडीचे प्रभाकर पाटील, सांगलीचे बाळासाहेब शिंदे आणि मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी येथील सुरेश पाटील यांचा समावेश आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणूकविषयक तरतुदींचा विचार केल्यास वसंतदादा कारखान्याच्या पहिल्या निवडणुकीवर नव्या नियमांचा प्रभाव पडू शकत नाही.
सलग तीन वर्षे ऊस घातला नाही, तर उमेदवारी अर्ज बाद ठरविण्याच्या तरतुदीचा गैरअर्थ काढण्यात आला आहे. त्यामुळे छाननी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने पार पाडण्यात आली आहे, असे म्हणणे अपील केलेल्या उमेदवारांनी केले आहे. पाचपैकी चारजणांच्यावतीने म्हणणे सादर करण्यात आले असून, वसंतदादा कारखाना प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनीही आपले म्हणणे मांडले आहे. आता रावल यांच्या निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९० उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. छाननी प्रक्रिया संपली तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र होते. सत्ताधारी गटासह, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले.
आरक्षित जागांवरील उमेदवारांना उसाचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज वैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. (प्रतिनिधी)
जवळपास १४ जागांवर बिनविरोधची चर्चा यशस्वी झाल्यानंतर उर्वरीत ७ जागांसाठी चर्चा करण्यासाठी रविवारी सत्ताधारी गटाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी गटातून संभाजी मेंढे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन जागा मागितल्या होत्या, मात्र त्यांना एकच जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. महिला गटासह सांगली व मिरजेतील मतदारसंघातील काही जागांबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. छाननीच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय होणार आहे.