काँग्रेसमध्ये वसंतदादा गटाची नाराजी उफाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:56+5:302021-08-29T04:26:56+5:30
सांगली : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डावलल्यामुळे वसंतदादा गटातील कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे. या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गुप्त बैठक काँग्रेस ...

काँग्रेसमध्ये वसंतदादा गटाची नाराजी उफाळली
सांगली : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डावलल्यामुळे वसंतदादा गटातील कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे. या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गुप्त बैठक काँग्रेस भवनात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या निर्णयप्रक्रियेबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त करीत वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्याची भूमिका मांडण्यात आली.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत विशाल पाटील व आमदार विक्रम सावंत हे दावेदार होते. अखेर सावंत यांची या पदावर निवड करून विशाल पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. जिल्हाध्यक्षपदी डावलल्याने वसंतदादांना मानणारा गट नाराज झाला आहे. यातून या गटाने तातडीने शुक्रवारी रात्री काँग्रेस कमिटीत गुप्त बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे खजिनदार पी. एल. रजपूत, मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, उपमहापौर उमेश पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते अय्याज नायकवडी, वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील, विशालदादा युवा प्रतिष्ठान सांगलीचे जिल्हाध्यक्ष बंडू पाटील उपस्थित होते. यावेळी विशाल पाटील यांना योग्य संधी न मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षाकडून अशी सापत्नपणाची वागणूक मिळू नये, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. विशाल पाटील हे सांगलीत आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवावी, असे ठरविण्यात आले.
चौकट
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का
जिल्हाध्यक्षपदावर २५ वर्षांहून अधिक काळ एकाच गटाला संधी देण्यात येत आहे. अशाप्रकारे एकाच गटाकडे वारंवार पद देण्यासाठी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. पक्ष म्हणून सर्वांना समान संधी मिळायला हवी, अशी संतप्त भावना एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.
चौकट
वसंतदादा घराणेच टार्गेट
निवडणुकीतील उमेदवारीपासून पक्षाच्या महत्त्वाच्या पदापर्यंत सर्व बाबतीत वसंतदादा गटाला डावलण्यात येते. अनेक वर्षांपासून असे प्रकार घडत आहेत. वसंतदादा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग महापालिका क्षेत्रात व मिरज तालुक्यात आहे. तरीही पदांपासून दूर करण्यासाठी वसंतदादा गटालाच का टार्गेट केले जात आहे, असा सवाल कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.
चौकट
वरिष्ठांकडे तक्रार करणार
वसंतदादा गटाला वारंवार डावलण्याच्या प्रकाराबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याचा इरादा अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केला. पक्षाने या भावनांची दखल घेतली नाही, तर पक्षवाढीसाठी ही गोष्ट मारक ठरेल, असेही मत मांडण्यात आले.