वसंतदादा बँक; १५ एप्रिलला सुनावणी
By Admin | Updated: March 28, 2015 00:01 IST2015-03-27T23:12:29+5:302015-03-28T00:01:52+5:30
कागदपत्रे तयार : चौकशी अधिकारी रैनाक अहवाल देणार

वसंतदादा बँक; १५ एप्रिलला सुनावणी
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे. आज, शुक्रवारी चौकशी अधिकारी डॉ. एस. डी. रैनाक यांनी बँकेच्या प्रशासनाकडून कागदपत्रांची जमवाजमव करून ती कर्मचारी व संचालकांना देण्याची तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी संचालकांनाही सुनावणीसाठी बोलाविण्यात आले आहे. चौकशी अधिकारी रैनाक यांनी ३४ संचालक व ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजाविली आहे. कर्मचाऱ्यांनी गत सुनावणीवेळी कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार रैनाक यांनी बँकेच्या अवसायकांकडून माहिती जमा केली आहे. कर्मचाऱ्यांना लेखापरीक्षणाच्या अहवालासह इतर कागदपत्रे सोमवारपर्यंत देण्यात येणार आहेत. तसेच संचालकांनीही याच कागदपत्रांची मागणी केल्याने त्यांनाही माहिती उपलब्ध करून दिली जाईल. या कागदपत्रांच्याआधारे संचालक व कर्मचारी म्हणणे सादर करणार असून त्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गैरव्यवहाराचा ठपका
बँक २००७ मध्ये बंद पडली. बँकेच्या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. विनातारण कर्ज, कमी तारणी कर्ज, पहिले कर्ज थकित असताना पुन्हा कर्जवाटप आदीबाबत संचालक व कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.