विजयभाऊ पाटील यांच्या स्मृतिनिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:04+5:302021-09-04T04:32:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहराचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या स्मृतिनिमित्त दि. ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत ...

विजयभाऊ पाटील यांच्या स्मृतिनिमित्त विविध उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहराचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या स्मृतिनिमित्त दि. ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत मोफत आरोग्य शिबिर, औषध फवारणी आणि पूरग्रस्तांना साहित्य वाटप असे उपक्रम होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, शहर विकासात विजयभाऊ पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृती शहरवासीयांच्या मनात कायम राहाव्यात यासाठी दि. ५ सप्टेंबरची पुण्यतिथी आणि दि. १० सप्टेंबरला जयंती दिनाचे औचित्य साधत हे उपक्रम होतील. युवक राष्ट्रवादीकडून ५ व ६ सप्टेंबरला शहराच्या सर्व भागात साथरोग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येईल. दि. ७ रोजी इस्लामपूर अर्बन बँकेतर्फे बहे गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याची मदत दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी डॉक्टर सेल आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दि. ११ रोजी संभूआप्पा मठात मोफत सर्वरोग निदान आणि उपचार शिबिर होणार आहे. डॉ. अतुल मोरे आणि ट्रस्टचे डॉक्टर या शिबिरात रुग्ण तपासणी करतील. दि. १२ सप्टेंबरला नेर्ले येथील बँकेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये शाखा स्थलांतर कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी असतील, तर आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अशोक उरुणकर, नगरसेवक शहाजी पाटील, संचालक शंकर चव्हाण उपस्थित होते.