पूर्व, पश्चिम, उत्तरेतील गावांची बदलती कहाणी--राजकीय भूगोल
By Admin | Updated: September 18, 2014 23:23 IST2014-09-18T23:09:07+5:302014-09-18T23:23:31+5:30
सांगली मतदारसंघ : ग्रामीण व शहरी भागातील मतांच्या संमिश्र गणितावर राजकारणाची मदार

पूर्व, पश्चिम, उत्तरेतील गावांची बदलती कहाणी--राजकीय भूगोल
अविनाश कोळी - सांगली -दक्षिणेचा भाग सोडला, तर सांगली विधानसभा मतदारसंघातील अन्य तीन दिशांच्या गावांचे सांगली विधानसभा मतदारसंघाशी असलेले नाते बदलत राहिले. या मतदारसंघातील पश्चिमेची गावे इस्लामपूर मतदारसंघाशी, तर पूर्व व उत्तरेची काही गावे मिरज मतदारसंघाशी जोडली व नंतर तोडली गेली. या बदलांचे फारसे परिणाम मात्र येथील निकालांवर दिसून आले नाहीत.
सांगली विधानसभा मतदारसंघात सांगली शहरासह चारही बाजूंना असणाऱ्या छोट्या-छोट्या गावांचा समावेश आहे. सध्या महापालिका क्षेत्र वगळता अन्य बारा गावे या मतदारसंघात समाविष्ट आहेत. गत निवडणुकीत सांगली मतदारसंघात मोठे बदल झाले. या मतदारसंघात पूर्वी तुंग, कसबे डिग्रज, मिरजवाडी, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, मौजे डिग्रज, नावरसवाडी ही पश्चिम भागातील काही वाळवा व मिरज तालुक्यातील गावांचा समावेश इस्लामपूर मतदारसंघात झाला. या भागातून आ. संभाजी पवार यांना चांगली मते मिळाल्याच्या नोंदी आहेत. ही गावे गेल्यानंतर गत निवडणुकीत संभाजी पवारांच्या समर्थकांत नाराजीचा सूर उमटत होता. तरीही अन्य ग्रामीण भागातून गतवेळी त्यांना काँग्रेस उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली होती. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला, तर या मतदारसंघात बदल होऊनही निवडणूक निकालात ग्रामीण आणि शहरी असे वेगवेगळे चित्र कधीच दिसले नाही.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरज पूर्व भागातील गावे कवठेमहांकाळला जोडून मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. त्याऐवजी पश्चिम भागातील नांद्रे, वसगडे, बिसूर, कवलापूर, बुधगाव, माधवनगर ही काँग्रेस समर्थकांची मोठी संख्या असलेली गावे मिरज मतदारसंघाला जोडण्यात आली होती. सध्या यातील माधवनगर, बिसूर, नांद्रे, बुधगाव ही गावे सांगली मतदारसंघात आहेत. अंकली, इनाम धामणी व हरिपूर ही गावे कायम सांगलीशी संलग्न राहिली. पूर्वी कुपवाड व वानलेसवाडी हा भाग सांगलीत नव्हता. १९९८ ला महापालिका झाली आणि नंतर हे दोन्ही भाग सांगली विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील मोठी लोकसंख्या आता या मतदारसंघातील निकालासाठी निर्णायक ठरू लागली आहेत. या मतदारसंघातील मतदारसंख्या आता सव्वा तीन लाखाच्या घरात आहेत. यातील बहुतांश मतदार महापालिका क्षेत्रातील आहेत. बारा गावांमधील जनतेचा कौल आणि शहरी भागातील कौल संमिश्र राहिला.
पश्चिम आणि पूर्वेकडील गावांची सारखी अदलाबदल झाल्याने याठिकाणी दीर्घकाळ कोणत्याही पक्षाचे, नेत्याचे वर्चस्व राहिले नाही. पद्माळ, कर्नाळ, नांद्रे या गावांवर आजही काँग्रेसचे वर्चस्व आहे. वसंतदादांचे मूळ गाव पद्माळे हे सांगली मतदारसंघात कायम राहिले. वसंतदादांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. १९५२ ते १९८५ पर्यंत उत्तर-पूर्व गावांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. आता या गावांमध्ये वर्चस्वाचा दावा कोणीही करू शकत नाही.
राजकारण बदलले
२00९ च्या निवडणुकीत मतदारसंघात बदल झाले. गतवेळी आ. संभाजी पवार व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील एकत्र होते. या एकीचा फायदा पश्चिमेकडील गावांमध्ये झाला. यंदाच्या निवडणुकीत यातील काही गावे इस्लामपूरला जोडली गेली आहेत. जयंत पाटील व संभाजी पवारांमध्ये दरी आल्याने पश्चिमेची गावे आणि महापालिका क्षेत्रात दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांविरोधात कुरघोड्या करण्याची चिन्हे आहेत.