मुंबईचे वऱ्हाड विटा पोलिसांच्या दारात!
By Admin | Updated: February 9, 2015 23:57 IST2015-02-09T23:31:49+5:302015-02-09T23:57:02+5:30
पोलीस उपअधीक्षकांची मध्यस्थी : लेखी जबाबानंतर विवाह समारंभच रद्द

मुंबईचे वऱ्हाड विटा पोलिसांच्या दारात!
विटा : नवरा मुलगा विट्याचा, तर नवरी मुलगी मुंबईची. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून रेशीमगाठी बांधण्यासाठी दोन्ही कुटुंबांची जवळीक... साखरपुडा झाल्यानंतर नियोजित वर-वधूची मोबाईलवरून आणखी जवळीक... दोन्ही कुटुंबांच्या वाढत्या आशा-अपेक्षा... विवाहाला २४ तासांचा अवधी... विवाहासाठी आज (सोमवारी) मुंबईचे वऱ्हाड विट्यात दाखल झाले... पण त्या वऱ्हाडाला लग्नमंडपात नव्हे तर विटा पोलिसांच्या दारात जावे लागले!
सातारा येथे नोकरी करणाऱ्या विटा येथील एका युवकाचा विवाह मुंबईस्थित तरुणीशी उद्या, मंगळवारी येथील एका मंगल कार्यालयात होणार होता. दोघेही उच्चशिक्षित. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून त्या दोन कुटुंबांची ओळख झाली. साखरपुडाही झाला. विवाहासाठी दि. १० फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यासाठी विट्यातील मंगल कार्यालयाचे बुकिंग करण्यात आले. परंतु, साखरपुडा झाल्यानंतर पाच ते सहा दिवसातच दोन्ही कुटुंबांच्या आशा-अपेक्षा वाढत गेल्या.
शिवाय बाहुल्यावर चढण्याआधीच नियोजित वर-वधूतही वादाची दरी वाढत गेली, तरीही उद्या विटा येथे विवाह असल्याने नियोजित वधूकडील मूळ वऱ्हाडी मंडळी मुंबईहून आज विट्यात दाखल झाली. त्यावेळी दोन कुटुंबात पुन्हा वाद पेटला. शेवटी मुंबईची वऱ्हाडी मंडळी थेट विटा पोलिसांच्या दारात हजर झाली. त्यावेळी नियोजित वराकडील वऱ्हाडी मंडळींनाही पोलीस ठाण्यात बोलावणे धाडण्यात आले. वराकडील मंडळी सायंकाळी सह वाजता पोलिसांच्या दारात आली.
डॉ. अभिजित पाटील यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले. वराच्या नातेवाईकांनी हा विवाह होणार नाही, असा पवित्रा घेतला, परंतु नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण दिल्याने व साखरपुडा झाल्याने चारचौघांत वेगळी चर्चा होणार, या भीतीने वधूच्या नातेवाईकांनी मिळते-जुळते घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय वराच्या नातेवाईकांनी फेटाळून लावला. शेवटी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी वधू व तिच्या नातेवाईकांना पुढील धोका समजावून सांगून हा विषय येथेच थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे नियोजित वर-वधूच्या नातेवाईकांनी यापुढे दोन्ही कुटुंबांत कोणताही संबंध राहणार नसल्याचे सांगून तसा लेखी जबाब पोलिसांत दिला! (वार्ताहर)
शहरात चर्चा
नियोजित विवाहच रद्द करून मुंबईची वऱ्हाडी मंडळी विटा पोलीस ठाण्यातून रात्री उशिरा मुंबईकडे मार्गस्थ झाली. उद्या होणारा नियोजित विवाह असा अचानक रद्द झाल्याने व या विवाहासाठी आलेले मुंबईचे वऱ्हाड थेट विटा पोलिसांच्या दारात गेल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू होती.