शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूरकरांनी बांधली वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:00+5:302021-02-05T07:20:00+5:30
खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी विद्यापीठाने खानापूर येथील येऊन जागेची पाहणीही ...

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूरकरांनी बांधली वज्रमूठ
खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी विद्यापीठाने खानापूर येथील येऊन जागेची पाहणीही केली होती; परंतु सध्या हे उपकेंद्र अन्य तालुक्यात हलविण्यासाठी काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप सुरू केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला झाले पाहिजे यासाठी आता अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर रविवारी खानापूर घाटमाथ्यावरील अगस्ती मंदिरात खानापूर, आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांची बैठक झाली.
या बैठकीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला का झाले पाहिजे व त्याचे फायदे काय, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याची दिशा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांनी बैठकीत विशद केली. त्यानंतर खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी खानापूर व आटपाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसभा व मासिक मीटिंगचे ठराव एकत्र घेऊन शासनाला व शिवाजी विद्यापीठाला देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच येणाऱ्या या आठ दिवसांत प्रत्येक गाव व बैठकांचे नियोजन करण्याचा निर्णय ही घेण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आटपाडीचे कार्यकर्ते अंकुश मुढे, सुयश कदम, सुनील हसबे, वसंतराव यादव, दौलत भगत, विकास देसाई, शक्ती धेंडे, अमित धेंडे, साहिल पवार, पंकज पांडकर, सचिन जाधव, दाजी पवार, जगन्नाथ मुळीक, विश्राम सूर्यवंशी, विजय भगत, नानासो शिंदे, शाहरुख पठाण, प्रशांत गायकवाड, अभिजित शेटे यांच्यासह विद्यार्थी, पदवीधर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. गणेश धेंडे यांनी आभार मानले.
फोटो : २४ विटा १
ओळ : खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या मागणीसाठी खानापूर व आटपाडी तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऐनवाडी येथील अगस्ती मंदिरात बैठक झाली.