वैशाली पाटील, चंदनशिवे यांना सदस्यत्व रद्दचा इशारा
By Admin | Updated: October 8, 2015 00:37 IST2015-10-07T23:13:15+5:302015-10-08T00:37:34+5:30
कवठेमहांकाळचे राजकारण : सांगलीत बैठक

वैशाली पाटील, चंदनशिवे यांना सदस्यत्व रद्दचा इशारा
सांगली : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सामील झालेले कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती वैशाली पाटील व पं. स. सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा बुधवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीत बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या निवासस्थानी कवठेमहांकाळ पंचायत समितीचे पाच सदस्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सातही सदस्यांनी एकत्र असल्याचे स्पष्ट करून पक्षीय आदेशाला बांधील असल्याचे सांगितले. या बैठकीबाबत माहिती देताना विलासराव शिंदे म्हणाले की, पंचायत समितीचे ९ सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाच्या विरोधात काम करता येणार नाही. या कृतीबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याच्या हालचाली पक्षीय स्तरावर सुरू झाल्या आहेत.
चिन्हावर निवडून येऊनही अन्य पक्षात प्रवेश करणाऱ्या या दोन्ही पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करता येते का, याबाबत कायदेशीर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर आता सभागृहात उपसभापतींच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य काम करणार आहेत. सभापती वैशाली पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतही लवकरच घेऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
तेही आमचेच...
सांगलीतील बैठकीला उपसभापती जगन्नाथ कोळकर, उषाताई ओलेकर, सुरेखा कोळेकर, कल्पना पाटील, पतंगराव माने उपस्थित होते. घोरपडे गटाचे अन्य दोन सदस्य या बैठकीला उपस्थित नव्हते, मात्र तेसुद्धा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्याने तेही आपलेच सदस्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले.