वैभव नायकवडी काँग्रेसच्या वाटेवर

By Admin | Updated: July 25, 2014 23:35 IST2014-07-25T23:01:33+5:302014-07-25T23:35:51+5:30

हालचालींना गती : मुंबई, दिल्ली दौरे वाढले

Vaibhav Nayakwadi on the way to Congress | वैभव नायकवडी काँग्रेसच्या वाटेवर

वैभव नायकवडी काँग्रेसच्या वाटेवर

महेंद्र किणीकर -वाळवा
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे सुपुत्र व हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. अलीकडील काळात त्यांच्या मुंबई, दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. शिवाय प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे.
नागनाथअण्णांनी वयाच्या आठव्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत तिरंगा खांद्यावर घेतला होता. तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत खाली ठेवला नाही. अण्णांनी जातीयवादी पक्षांना कधीही जवळ केले नाही. डाव्या विचारसरणीनेच त्यांची वाटचाल राहिली. दलित समाजाच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी अण्णांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. राजारामबापू पाटील जनता पक्षात गेल्यानंतर वाळवा तालुक्यात त्यांना नागनाथअण्णांनी टोकाचा विरोध केला. त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना समान अंतरावर ठेवले होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लापाण्णा आवाडे यांचा प्रचार केला होता. तेव्हापासून त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याविरोधात लढवली होती.
शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापेक्षा काँग्रेस हाच एकमेव पर्याय मानून त्यांनी त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. अण्णांच्या जयंती कार्यक्रमानंतर वैभव नायकवडी यांच्या मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या असून विधानसभा निवडणुकीआधी ते पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जाते. नागनाथअण्णांनी हुतात्मा संकुलाच्या सर्व संस्थांमधील कारभारात पारदर्शकता आणली. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाने निर्माण झालेला अण्णांचा दबदबा व तीव्र लढा यामुळे राज्यकर्त्यांना भरलेली धडकी सर्वश्रुत आहे. मात्र अण्णांच्या निधनानंतर तीन वर्षात ही किमया ओसरू लागली आहे. वैभव नायकवडी यांना अपक्ष राहून करणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी सक्रिय राजकारणात उतरून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे हुतात्मा संकुलातून चर्चिले जात आहे.

हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमांना आतापर्यंत कधीही एकाच राजकीय पक्षाचे प्रमुख निमंत्रित केले जात नव्हते, परंतु नागनाथअण्णांच्या १५ जुलैरोजी झालेल्या जयंती कार्यक्रमास प्रथमच काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ सिनेअभिनेते माजी खासदार राज बब्बर, तर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नायकवडी यांची दोन्ही नेत्यांशी बंद खोलीत काँग्रेस प्रवेशाबाबत खलबते झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Vaibhav Nayakwadi on the way to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.