आज जिल्हाभरात लसीकरण बंद राहणार, खासगीतही लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:42+5:302021-05-09T04:27:42+5:30
सांगली : जिल्हाभरात कोरोनाचे लसीकरण रविवारी (दि. ९) बंद राहणार आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटाचा साठाही संपला असून ...

आज जिल्हाभरात लसीकरण बंद राहणार, खासगीतही लस नाही
सांगली : जिल्हाभरात कोरोनाचे लसीकरण रविवारी (दि. ९) बंद राहणार आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटाचा साठाही संपला असून त्यांचेही लसीकरण होणार नाही. खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध नाही.
४५ वर्षांवरील वयोगटाची लस शुक्रवारीच संपली आहे. त्यामुळे शनिवारी लसीकरण बंद राहिले. पुण्यातून लसीचा पुरवठा न झाल्याने आता रविवारीदेखील लसीकरण होणार नाही. पाच केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू होते, हा साठादेखील शनिवारी संपला, त्यामुळे त्यांचेही लसीकरण नवीन लस येईपर्यंत बंद राहणार आहे. या गटासाठीची लस रविवारी रात्री येण्याची शक्यता आहे. ४५ वर्षांवरील वयोगटासाठीची लस कधी येईल, याची मात्र निश्चिती नाही.
केंद्र शासनाच्या कोविन पोर्टलवर काही खासगी रुग्णालयांमध्ये आठवडाभरासाठी लसीचे आरक्षण झाल्याचे दिसते, पण ती तांत्रिक चूक असून त्यांच्याकडेही लस नसल्याचा खुलासा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांचे सर्वच मार्ग खुंटले आहेत.
शनिवारीचे लसीकरण असे :
१८ ते ४४ वर्षे वयोगट - ८८६
४५ ते ५९ वर्षे वयोगट - ७५२
६० वर्षांवर - ७५२
आज दिवसभरात - २६६०
आजअखेर एकूण - ५,९८,३८६