लसीकरण एकाच, प्रमाणपत्र मात्र दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:30+5:302021-04-23T04:29:30+5:30

सांगली : महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणाबाबत सावळागोंधळ सुरू आहे. एका व्यक्तीने गावभागातील आरोग्य केंद्रावर लस घेतली असताना त्याला ...

Vaccination only one, certificate only two | लसीकरण एकाच, प्रमाणपत्र मात्र दोन

लसीकरण एकाच, प्रमाणपत्र मात्र दोन

सांगली : महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणाबाबत सावळागोंधळ सुरू आहे. एका व्यक्तीने गावभागातील आरोग्य केंद्रावर लस घेतली असताना त्याला जामवाडी केंद्रावरून पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. याची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिंदे म्हणाल्या की, प्रभागातील रहिवासी चंद्रकांत पाटील यांनी लसीकरणासाठी जामवाडी आरोग्य केंद्रावर नोंदणी केली होती; पण तेथे लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी गावभाग आरोग्य केंद्रावर नावनोंदणी करून लस घेतली. असे असताना जामवाडी येथील आरोग्य केंद्रामार्फत त्यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र पाठवण्यात आले. पाटील यांच्या नावे खर्ची पडलेली लस नेमकी कुठे गेली, याची चौकशी व्हावी. एका दिवसामध्ये केवळ पन्नास लोकांनाच लस देणार अशी उत्तरे आरोग्य केंद्रांवर नागरिकांना दिली जात आहेत.

नागरिकांची नोंदणी करून घेण्यास आरोग्य केंद्रांवर नकार देण्यात येत आहे. अँटिजेन चाचणीबाबत चालढकल सुरू आहे. अनेकवेळा डॉक्टरांच्या गैरउपस्थितीत केवळ नर्सिंग स्टाफ व आशा सेविका यांच्यावर लसीकरण केंद्राची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनासाठी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

Web Title: Vaccination only one, certificate only two