आष्टा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना आजपासून लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST2021-05-10T04:26:10+5:302021-05-10T04:26:10+5:30
आष्टा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोमवारपासून फक्त १८ ते ४५ वर्ष या ...

आष्टा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना आजपासून लस
आष्टा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोमवारपासून फक्त १८ ते ४५ वर्ष या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी यांनी केले आहे. आजअखेर ४५ वर्षांवरील सहा हजार १८३ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
आष्टा ग्रामीण रुग्णालयात आष्टा परिसरासह राज्यातील विविध भागातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात फक्त ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. सुरुवातीला जे नागरिक येतील त्या नागरिकांना लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येत होते. सुरुवातीला लस मिळाली; परंतु त्यानंतर गत आठवड्यात तीन ते चार दिवस लस उपलब्ध झाली नसल्याने गोंधळ निर्माण झाला.
आष्टा शहरातील नागरिकांनी पहाटे चार ते पाच वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर गर्दी केली. ग्रामीण रुग्णालयात आष्टा पोलिसांना बोलवावे लागले. नागरिकांची गर्दी झाल्यामुळे कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला. याबाबत ऑनलाइन नोंदणीचा तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे आष्ट्यासह देशातील कोणत्याही नागरिकाने आष्टा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नोंदणी केल्यास त्याला कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. दररोज सुमारे २०० लोकांना लस मिळणार आहे.
चौकट:
आष्टा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणसाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहाटेच्या वेळी गर्दी केली. अनेक वृद्ध महिला, पुरुष रांगेत उभे राहिले. मात्र काही लोकांना मधूनच लसीकरण करण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. आता ऑनलाइन नोंदणीमुळे अशा प्रकारांना चाप बसणार आहे.