पूरग्रस्त १०४ गावांमध्ये प्राधान्याने लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:36+5:302021-07-01T04:19:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदीकाठच्या चार तालुक्यांतील १०४ गावांना पुराचा धोका आहे. तेथे प्राधान्याने लसीकरण ...

पूरग्रस्त १०४ गावांमध्ये प्राधान्याने लसीकरण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदीकाठच्या चार तालुक्यांतील १०४ गावांना पुराचा धोका आहे. तेथे प्राधान्याने लसीकरण करून घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. पुरात लाकडी बोटींचा वापर करू नका, अशा सूचनाही सरपंच, ग्रामसेवकांना दिल्या.
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आपत्तीपूर्व व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यावेळी कोरे बोलत होत्या. यावेळी आरोग्य सभापती आशा पाटील आणि अधिकारी उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी कोरे यांनी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, सध्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यांत चांगला पाऊस झाल्यास पुराचाही धोका आहे. यामुळे आरोग्य विभागाने कोरोनाचे संकट टाळण्यासाठी पूरग्रस्त १०४ गावांमधील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. त्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे. पूरग्रस्त भागातील जनावरांचे लसीकरणही तातडीने करून घ्यावे. पुरवठा विभागाने १०४ गावांमध्ये रेशनिंगचा पुरवठा करण्याची गरज आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधून विनंती करणार आहे.