कडेगाव आणि चिंचणी हायस्कूलच्या इमारतीत लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:31+5:302021-05-03T04:21:31+5:30
प्रताप महाडिक कडेगाव : कडेगाव तालुक्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू असलेल्या चिंचणी आणि कडेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना ...

कडेगाव आणि चिंचणी हायस्कूलच्या इमारतीत लसीकरण करा
प्रताप महाडिक
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू असलेल्या चिंचणी आणि कडेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी,
तसेच लसीकरणासाठी आलेल्या लोकांची गर्दी होत असल्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून या दोन्ही रुग्णालयांमधील लसीकरण केंद्र जवळच्या शाळेच्या इमारतीत सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कडेगाव आणि चिंचणी या दोन्ही रुग्णालयांत ३० ऑक्सिजन बेडची सोय असलेली डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू आहेत. येथे कोरोना चाचण्या घेण्यासाठी
येणाऱ्या, तसेच रुग्णालयात ॲडमिट असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची रहदारी सातत्याने सुरू असते. यातच या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. लसीकरणाला नागरिकांची गर्दी होत असून, लांबच लांब रांगा लागत आहेत. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, कोरोनाचा संक्रमणाचा धोका आहे.
कडेगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, ही स्थिती चिंताजनक आहे. यामुळे कोरोना चाचण्या व लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. लसीचे डोस जितके उपलब्ध झालेले असतात, त्यापेक्षा खूप मोठ्या संख्येने लोक लस घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोकं आल्याने लसीकरणाच्या ठिकाणी गोंधळ व गर्दी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी
उपाययोजना म्हणून कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व चिंचणी येथील श्री.शिवाजी हायस्कूलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे व लसीकरणासाठी स्वतंत्र स्टाफ द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या दोन्ही शाळांना प्रशस्त इमारत, व्हरांडा आहे.येथे संगणक व इंटरनेट सुविधा आहेत. ध्वनिक्षेपक आहेत, मोठे मैदान आहे, याशिवाय झाडांची सावली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखणे सोयीचे होणार आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून लसीकरण केंद्र या शाळांच्या इमारतींमध्ये सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट :
आरोग्य केंद्रातही गर्दी :
कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव, खेराडे (वांगी), हिंगणगाव (बुद्रुक), नेवरी या आरोग्य केंद्रातही कोरोना चाचण्या आणि लसीकरण यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होत आहे. येथे गर्दी कमी करण्यासाठी जितक्या लसी उपलब्ध आहेत तितक्याच नोंदी घेऊन उर्वरित लोकांना योग्य त्या सूचना देऊन गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
फोटो : ०२ कडेगाव १
इमारत ग्रामीण रुग्णालय कडेगाव