सांगली : उटगी (ता. जत) येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सरकारी जागेत घरे बांधून शासनाची फसवणूक केली आहे. याची चौकशी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उटगीचे माजी सरपंच भीमराय बिरादार व विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जिन्नेसाहेब खानापुरे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उटगी येथे जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात निवडून आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी उटगी गावातील गायरान सर्व्हे नं. दोनमध्ये सरकारी जागेत घरे बांधून राहत आहेत. सरकारी नियमानुसार कोणत्याही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सरकारी जागेचा गैरवापर करू नये असा नियम केला आहे; मात्र उटगी येथील सरपंच सविता कांबळे, उपसरपंच कमलाबाई पाटील व सदस्य परप्पा गडदे, रेणुका केळी य़ांनी या नियमाला पायदळी तुडवून स्वत:ची घरे गायरान जागेत बांधून सरकारची फसवणूक केली आहे. याची चाैकशी करुन सदस्यत्व रद्द करावी अशी मागणी बिरादार आणि खानापुरे यांनी केली आहे.