उमराणीतील उषा अभंगे यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:23+5:302021-06-21T04:18:23+5:30
जत : उमराणी (ता. जत) येथील काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्य उषा बाळासाहेब अभंगे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व कायमचे रद्द करण्याचे आदेश ...

उमराणीतील उषा अभंगे यांचे सदस्यत्व रद्द
जत : उमराणी (ता. जत) येथील काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्य उषा बाळासाहेब अभंगे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व कायमचे रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
उमराणी ग्रामपंचायतीची निवडणूक गतवर्षी झाली होती. या निवडणुकीत उषा अभंगे या विजयी झाल्या होत्या. उषा अभंगे यांनी गावात अतिक्रमण केले असून, त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी गावठाण जागेत अतिक्रमण करून त्यांनी घर बांधले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे उमराणी येथील मिनाक्षी यल्लाप्पा अभंगे यांनी तक्रार केली होती. जिल्हाधिकारी चौधरी यांच्याकडे याविषयीची सुनावणी झाली. या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत ग्रामपंचायत सदस्य उषा अभंगे यांचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्याचा आदेश दिला.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या उमराणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने युती करुन काँग्रेसच्या पॅनलचा पराभव केला होता. पंधरापैकी काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले होते. मात्र, उषा अभंगे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आले आहे.