सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ऑक्सिजनचा वापर करताना रुग्णाची गरज आणि निकड लक्षात घेऊनच ऑक्सिजनचा वापर करावा. रेमडेसिविर हे जीवन रक्षक औषध नाही. याचा वापर केल्याने रुग्ण बरा होतो आणि नाही केला तर रुग्ण बरा होत नाही, असे चित्र उभे राहिले आहे, त्यामुळे सरसकटपणे डॉक्टरांनी वापर न करता आवश्यकतेनुसारच वापर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
जिल्ह्यातील ४१ कोविड हॉस्पिटलचे डॉक्टर्स, ग्रामीण रुग्णालयांचे डॉक्टरांशी ऑनलाइन पद्धतीने जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने रेमडेसिविरचा सरसकट वापर न करता आवश्यकतेनुसार करण्याविषयी सांगत ऑक्सिजनचा वापरही नियमानुसारच केल्यास रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मालानी, डॉ. अमृता दाते, डॉ. फडके, डॉ. योगेश वाघ यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर यांचा सुनियोजित वापर, राज्य टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन याबद्दल बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.