‘अंगणवाडी’तील मानधनासाठी आग्रह

By Admin | Updated: December 23, 2015 01:17 IST2015-12-23T00:55:40+5:302015-12-23T01:17:54+5:30

जिल्हा बँक : राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याची तयारी

Urgent requests for 'Anganwadi' | ‘अंगणवाडी’तील मानधनासाठी आग्रह

‘अंगणवाडी’तील मानधनासाठी आग्रह

सांगली : जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून होणे आवश्यक आहे. गावा-गावात बँक पोहोचली असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकच अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही शासनस्तरावर आग्रही मागणी करणार असल्याची माहिती मंगळवारी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. राज्यातील अशा ज्या जिल्हा बँका सक्षम आहेत, त्याठिकाणी अंगणवाडी सेविकांचे मानधन जिल्हा बँकांमार्फत केल्यास त्याचा लाभ बँकेपेक्षा अंगणवाडी सेविकांना अधिक होऊ शकतो. छोट्या गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सेविका किंवा मदतनीसांना मानधन काढण्यासाठी पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मिळणाऱ्या मानधनाचा विचार केला, तर हा प्रवासाचा खर्च न परवडणारा आहे. जिल्हा बँकेत खाती काढून बँकेमार्फत ही सेवा पुरविली गेल्यास हा संपूर्ण खर्च वाचणार आहे. बँकेची मोबाईल व्हॅनही अस्तित्वात असल्याने मानधन मिळविण्यासाठी कोणताही खर्च सेविकांना करावा लागणार नाही. त्यामुळे याबाबत शासनाला लवकरच आम्ही पत्र पाठविणार आहोत. प्रशासनाला यासंदर्भात मंगळवारी आदेश देण्यात आले आहेत.
शासनाकडे आग्रही मागणी आम्ही करू. असा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या सोयीचा निर्णय होईल. मध्यवर्ती बँकेचा विस्तार हा अन्य बँकांपेक्षा अधिक मोठा आहे. छोट्या-छोट्या गावांमधील लोकांनाही बँकिंगसाठी जिल्हा बँकच अधिक सोयीची ठरत आहे. वर्षानुवर्षाचा हा अनुभव पाहता, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या बाबतीतही जिल्हा बँकच अधिक सोयीची ठरेल, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

संख्या ५ हजाराच्या घरात
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या २४00 च्या घरात आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जिल्ह्यातील संख्या पाच हजाराच्या घरात जाते. त्यामुळे इतक्या खातेदारांना सेवा देणे जिल्हा बँकेला सहजशक्य आहे. त्यामुळे बँकस्तरावर आता यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: Urgent requests for 'Anganwadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.