म्हैसाळ योजनेचा तब्बल ६२ पंपांद्धारे उपसा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:45+5:302021-04-06T04:25:45+5:30
मिरज : म्हैसाळ योजनेच्या पाच टप्प्यातून तब्बल ६२ पंपांद्धारे पाणी उपसा सुरू असल्याने कालवा दुथडी भरून वाहत आहे. ...

म्हैसाळ योजनेचा तब्बल ६२ पंपांद्धारे उपसा सुरू
मिरज : म्हैसाळ योजनेच्या पाच टप्प्यातून तब्बल ६२ पंपांद्धारे पाणी उपसा सुरू असल्याने कालवा दुथडी भरून वाहत आहे. प्रतिसेकंद एक हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने जतपर्यंत पाणी पोहोचले आहे. रविवारी आरग येथे टप्पा क्रमांक ३ मध्ये तांत्रिक बिघाडामुळे होऊन दहा पंप बंद पडल्याने कालवा ओव्हरफ्लो होऊन परिसरातील शेतामध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले. बंद पडलेले पंप सुरू केल्यानंतर पाणी पुन्हा कालव्यातून वाहू लागले.
म्हैसाळ योजनेतून पूर्ण क्षमतेने उपसा सुरू असून, पहिल्या टप्प्यातील १४, दुसऱ्या टप्प्यातील १९, तिसऱ्या टप्प्यातील १०, चाैथ्या टप्प्यातील १२, पाचव्या टप्प्यातील ७ पंपांद्धारे पाणी उपसा सुरू असून, प्रतिसेकंद एक हजार क्युसेक विसर्ग कालव्यात सुरू आहे. योजनेच्या पाच टप्प्यातील ७५ पंपांपैकी ६२ पंप सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने उपसा सुरू आहे. डोंगरवाडी गव्हाण व बनेवाडी योजनेचेही प्रत्येकी तीन पंप व योजनेचे सर्व शाखा कालवे सुरू असून, जतपर्यंत पाणी पोहोचले आहे. योजनेच्या पाण्यासाठी हेक्टरी दीड हजार रुपये पाणीपट्टी आकारणी करण्यात येत असून, ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाल्याने पाणीपट्टी वसुलीस चांगला प्रतिसाद असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाैकट
शेतकऱ्यांचे नुकसान
कालवा ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसला. पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिके वाया गेली. पिकांची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. मात्र, काही तासांतच बिघाड दुरुस्त केल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत झाल्याचा दावा म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी केला. म्हैसाळ कालवा टप्पा क्र. ३ ओव्हरफ्लो झाला की शेजारील ओढ्याच्या पात्रातून कालव्याचे पाणी वाहते. सध्या ५२ मोटारी सुरू आहेत. पंप हाऊसमधील मोटारीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालवा ओव्हरफ्लो झाला होता.