ऊसदर आंदोलन पेटले

By Admin | Updated: December 18, 2015 00:45 IST2015-12-18T00:43:00+5:302015-12-18T00:45:20+5:30

‘८० : २०’ साठी शेतकरी आक्रमक : जिल्ह्यात जाळपोळ; बसेसवर दगडफेक; ऊसतोड ठप्प

The uproar movement aggravated | ऊसदर आंदोलन पेटले

ऊसदर आंदोलन पेटले

सांगली : उसाची एफआरपी ठरलेल्या ८०:२० या फॉर्म्युल्यानुसार देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ऊसतोड बंद आंदोलनास गुरुवारी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या टायर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. सावळवाडी (ता. मिरज) येथे राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाला. तासगाव तालुक्यात चार बसेसवर दगडफेक करण्यात आली. सांगलीत कर्नाळजवळ दहा बैलगाड्यांच्या टायर फोडण्यात आल्या, तर आमणापुरात रास्ता रोको आंदोलन झाले. आज, शुक्रवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘चक्का जाम’ आंदोलनास सुरुवात होणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार ऊस दर देण्यास जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी नकार दिल्याने आंंदोलनाचा भडका उडाला आहे. एफआरपीचा ८०:२० तोडगा निघाला असतानाही कारखानदारांनी एक पैसाही जमा न केल्याने शेतकऱ्यांत असंतोष आहे. बुधवारपासूनच जिल्ह्यात आंदोलनास सुरुवात झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या बेमुदत ऊस तोड बंद आंदोलनास शेतकऱ्यांतूनही प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील पलूस, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यांत ‘स्वाभिमानी’सह इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केल्याने, गुरुवारी ऊस वाहतूक ठप्प झाली होती. सुरू असलेली ऊस वाहतूकही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्याने सांगली-तासगाव, सांगली-कर्नाळ मार्गावर वाहने काही काळ थांबून होती. गुरुवारी सकाळी सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाळ-माधवनगर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या दहा बैलगाड्यांच्या टायर फोडल्या. दोन ट्रॉलींच्या टायरही फोडण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आमणापूर (ता. पलूस) येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मिरज पूर्वभागात ‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक अडवून आंदोलन केले. काही शेतकऱ्यांनी या आंदोलनास विरोध केल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांशी वादावादी झाली. कवठेमहांकाळ तालुक्यात रांजणी येथेही शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस वाहतूक अडविण्यात आली.

Web Title: The uproar movement aggravated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.