सांगली : सांगली बसस्थानकात जागा अपुरी आणि त्यातही शहरी बसेसचेही कामकाज तेथूनच होत आहे. दाटीवाटीत बसेस उभ्या कराव्या लागत आहेत. अनेक बसेस आडव्या-तिडव्या बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. त्याचा मनस्ताप प्रवाशांना करावा लागत आहे. बेशिस्त चालकांना शिस्त लावणारे एसटीचे अधिकारी कुठे गायब झाले आहेत, असा सवालही संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील सर्वांत मोठे आगार सांगली आहे. या आगारातून राज्य आणि अंतरराज्य वाहतूक होते. कोरोनापूर्वी रोज दिवसभरात ९१५ बसेसची ये-जा होत होती. सध्या रोज ४९५ बसेसचीच ये-जा होत आहे; परंतु स्थानकावर केवळ १२ फलाट आहेत. बसेस उभा करायला अडचणी येतात. बसेस आडव्यातिडव्या उभा राहत असल्याचे दिसते. ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्यासाठी स्थानकात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळे अपघातास सामोरे जावे लागते. बसस्थानकात येणे आणि जाणे, असे दोन प्रवेशद्वार असतानाही बसच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रवासी मिळविण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालक अडथळा निर्माण करतात. बसस्थानकावरील बस चालकांना शिस्त लावण्यासाठी गलेलठ्ठ पगार देऊन एसटी महामंडळाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांचे वाहतुकीला शिस्त लावण्याकडे फारसे लक्ष दिसत नाही. आडव्यातिडव्या बसेस पाहून या चालकांना शिस्त लावणारे अधिकारी कुणी आहेत की नाही, असा संतप्त सवाल एका प्रवाशाने केला.
चौकट
काय म्हणतात प्रवासी...
कोट
सांगली बसस्थानकासारखे घाणीचे साम्राज्य व बेशिस्त असलेले ठिकाण कुठेच सापडणार नाही. जागा अपुरी असली तरी स्वच्छता असायला हवी ना. येथे काहीच सुविधा नसतात; परंतु नाइलाजाने यावे लागते. यात सुधारणा करावी, एवढीच अपेक्षा आहे.
-श्रद्धा देशपांडे, मिरज
कोट
जिल्ह्याचे प्रमुख सांगली बसस्थानक असून, येथे मूलभूत सुविधा काहीच नाहीत. बसस्थानकात स्वच्छता नाही, खड्डे पडले असून, याकडे कोणच लक्ष देत नाही. बसेसही आडव्या-उभ्या कशाही उभा केल्या जात आहेत. काही चालकांच्या चुकीचा अन्य चालक, प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
-पांडुरंग पवार, तासगाव
कोट
सांगली बसस्थानकात १२ प्लॅटफॉर्म आहेत. रोज ४९४ बसेसची ये-जा आहे. बसेसची या स्थानकात येण्या-जाण्याची संख्या जास्त असली तरीही चालकांनी प्लॅटफॉर्मवरच व्यवस्थित बस लावणे अपेक्षित आहे. यामध्ये एखादा चालक बेशिस्तपणा करत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
-दीपक हेतंबे, आगारप्रमुख, सांगली