बायोमेट्रिक पध्दत बंद न केल्यास असहकार्य

By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:41:01+5:302015-02-21T00:16:31+5:30

मुन्ना कुरणे : रास्त भाव धान्य दुकानदारांचा मोर्चा

Unlikely if the biometric system is not closed | बायोमेट्रिक पध्दत बंद न केल्यास असहकार्य

बायोमेट्रिक पध्दत बंद न केल्यास असहकार्य

सांगली : बायोमेट्रिक पध्दत बंद करण्यात यावी, यासह रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा प्रशासकीय कामांना आमचा विरोध असेल, असा इशारा सांगली जिल्हा सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी दिला. विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, त्यावेळी ते बोलत होते.
बायोमेट्रिक पध्दत बंद करण्यात यावी, अन्न सुरक्षा योजना लागू करताना २०१५ ची कुटुंबाची संख्या विचारात घेण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आ. शरद पाटील, बिपीन कदम, सुभाष गोयकर आदी उपस्थित होते.
मुन्ना कुरणे म्हणाले की, बायोमेट्रिक पध्दतीमुळे दुकानदारांना किचकट काम वाढले आहे. या कामामध्येच सर्व वेळ जात आहे. आमच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास, आमच्याकडून प्रशासन करून घेत असलेली कामे आम्ही करणार नाही.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये डाळी, खाद्यतेल व साखर आदी जीवनोपयोेगी वस्तू देण्यात याव्यात, अंत्योदय शिधापत्रिका धारकास ३५ किलो धान्य देण्यात यावे, एपीएल कार्ड धारकास २० किलो गहू, १० किलो तांदूळ देण्यात यावा, केरोसिन विक्रेत्यांना किरकोळ व गॅस विक्री परवाने देण्यात यावेत, कोणताही निर्णय घेताना दुकानदारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, धान्य दुकानदारांना चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, शासनाकडे भरलेले पाम तेलाचे पैसे परत मिळावेत, अन्न सप्ताह व अन्न दिन याची अंमलबजावणी रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मोर्चाची सुरुवात आपटा पोलीस चौकीपासून करण्यात आली. मोर्चा काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी राजकुमार जोतराव, वसंत अग्रवाल, महादेव कदम, सुनील पवार, बाळासाहेब लकडे, वसंत जाधव, मुरार गुळभिले, शंकर कोरे, कुमार कोळी, आप्पासाहेब भोसले, महंमदहनिफ सतारमेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Unlikely if the biometric system is not closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.