विद्यापीठ उपकेंद्राला अद्याप तासगावात मंजुरी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:20+5:302021-06-29T04:19:20+5:30
विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे करण्यास शासनाने कोणतीही मंजुरी दिली नसल्याची माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत ...

विद्यापीठ उपकेंद्राला अद्याप तासगावात मंजुरी नाही
विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे करण्यास शासनाने कोणतीही मंजुरी दिली नसल्याची माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून दिली असल्याचे खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला खानापूरऐवजी तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मंजुरी दिली असल्याचे वृत्त येताच खानापूर घाटमाथ्यावर संतापाची लाट उसळली. सोमवारी जिल्हा परिषदेचे सदस्य सुहास शिंदे, किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, राजाभाऊ शिंदे, नगरसेवक हर्षल तोडकर, महेश माने यांच्यासह शिष्टमंडळाने आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना निवेदन दिले.
बाबर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी अनेक जुने प्रस्ताव दिले असताना याची शहानिशा न करता जुने प्रस्ताव प्रलंबित ठेऊन तासगाव तालुक्यात हे उपकेंद्र होण्यासाठी तत्त्वतः मान्यता का देण्यात आली, याची माहिती घेतली जाईल.
या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी कोणत्याही प्रकारची मंजुरी देण्यात आली नाही. तशा प्रकारची कोणतीही घोषणा केली नसल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे आमदार बाबर यांनी माहिती दिली.
या उपकेंद्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्षात भेट घेऊन खानापूरच्या जागेसंदर्भात झालेले मागील सर्व ठराव आणि कागदपत्रे याचा अभ्यास करून निर्णय घेण्याची मागणी करणार आहे. तसेच याबाबतची भूमिका मांडून उपकेंद्र खानापूरलाच होण्यासाठी मागणी करणार आहे. उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी व त्यास मंजुरी मिळेपर्यंत मी लोकप्रतिनिधी या नात्याने मी जनतेबरोबर राहणार असल्याचे ही आमदार अनिल बाबर म्हणाले.
फोटो - आमदार अनिल बाबर, यांचा वापरणे.