कडेगावात कॉँग्रेस एकसंध करा

By Admin | Updated: November 6, 2016 00:39 IST2016-11-05T23:47:21+5:302016-11-06T00:39:26+5:30

पतंगरावांच्या सूचना : बंडखोरी रोखण्यासाठी हालचाली गतिमान

Unite Congress in Kathmandu | कडेगावात कॉँग्रेस एकसंध करा

कडेगावात कॉँग्रेस एकसंध करा

प्रताप महाडिक -- कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. या उमेदवारांची नाराजी दूर करून काँग्रेस एकसंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी संबंधित प्रभागतील बंडखोरी रोखण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कडेगाव येथे सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे आव्हान आहे. पूर्वानुभव लक्षात घेता आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी स्वत: लक्ष घालून कडेगाव येथील काँग्रेस एकसंध करुन निवडणूक लढविण्याच्या सूचना दिल्या. कडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीवेळी कॉँग्रेस विरुध्द भाजप-कॉँग्रेस आघाडी अशी लढत झाली होती़. त्यावेळी ९ विरुध्द ८ अशा काठावरच्या बहुमताने कॉँग्रेसने सत्ता मिळविली. यानंतर केवळ ७ महिन्यातच कडेगाव नगरपंचायत स्थापन झाली. यामुळे आता येथे नगरपंचायत निवडणूक लागली आहे. आता मात्रआघाडीचे राजकारण न करता कॉँग्रेसचे स्थानिक नेते एकसंध झाले आहेत. परंतु काही इच्छुक उमेदवारांना कॉँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट मिळाले नाही, यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरले. आता ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणला. तालुक्याच्या निर्मितीनंतर कडेगाव ही राजकीय राजधानी मानून त्यांनी काम केले. येथील काँग्रेस नेते सुरेश निर्मळ, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, माजी सरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजू ऊर्फ प्रशांत जाधव, सागरेश्वर सूतगिरणीचे माजी अघ्यक्ष गुलाम पाटील, माजी उपसरपंच अविनाश जाधव आदी काँग्रेस नेते एकसंध करण्यात आमदार कदम यांना यश आले. आता काही प्रभागातील बंडखोरी रोखण्यासाठी आमदार पतंगराव कदम स्वत: प्रयत्न करतील, आशी चर्चा आहे. प्रभाग क्र. ३, ६, ८, ९, १५ व १६ मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज आहेत. यापैकी काही उमेदवार नेत्यांचा शब्द मानून माघार घेतील. भाजपनेही तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. यामुळे बंडखोरी रोखण्यात काँग्रेसला कितपत यश मिळते, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, अर्ज माघारीची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यत त्यामुळे आता कडेगाव नगरपंचायतीचे निवडणुकीची चित्र ११ नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे.


पतंगराव, विश्वजित यांच्यावर भिस्त
कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने दिग्गज उमेदवार मैदानात उतरविले आहेत. हे उमेदवार आता आपआपल्या प्रभागात बंडखोरी होऊ नये, याची दक्षता घेत आहेत. परंतु बंडखोरी रोखण्याबाबत संपूर्ण भिस्त आमदार पतंगराव कदम आणि डॉ. विश्वजित कदम यांच्यावर आहे. याकडे आता कडेगाव मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज कोणी मागे घेणार, याबाबतही सध्या चर्चा सुरु आहे.

Web Title: Unite Congress in Kathmandu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.