व्हॅलेंटाईन डेला संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:29+5:302021-02-15T04:23:29+5:30
कवठेमहांकाळ : अवघी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते ऋतुराज ...

व्हॅलेंटाईन डेला संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन
कवठेमहांकाळ : अवघी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते ऋतुराज पवार यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन घेतले. शेतकऱ्यांच्या बांधावर जात बळिराजाला गुलाबपुष्प दिले व भाजपने केलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करीत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रविवारी जाखापूर येथे एकत्रित आले. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि धरणीमाता खरी आपल्या प्रेमाची हक्कदार आहे, असे सूचित करीत, त्यांना गुलाबपुष्प दिले व हे पुष्प या भाजप सरकारविरोधात लढण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्रित आणील असा विश्वास व्यक्त केला.
संभाजी ब्रिगेडचे ऋतुराज पवार म्हणाले की, आज देशातील धरणीमाता आणि शेतकरी राजा भाजप सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे. बळिराजाला यातून सोडविणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संभाजी ब्रिगेड रविवारी या अनोख्या आंदोलनाने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे. तसेच यापुढे या काळ्या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे.
या आंदोलनात भोजलिंग पवार, योगेश चव्हाण, संतोष कोळेकर, आकाश पवार, दीपक पवार, अविनाश सुतार, आदी उपस्थित होते.