‘भू-विकास’चे कर्मचारी करणार अनोखे आंदोलन
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T00:18:25+5:302015-07-25T01:13:30+5:30
शासनाला पत्र देणार : आत्महत्येच्या परवानगीची मागणी

‘भू-विकास’चे कर्मचारी करणार अनोखे आंदोलन
सांगली : धुळे येथील भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आत्महत्येच्या परवानगीची मागणी केल्यानंतर, राज्यातील अन्य जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडूनही अशाच पद्धतीची मागणी करण्यात येणार आहे. या अनोख्या मागणीपत्राच्या आंदोलनातून भू-विकास बँकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे कर्मचारी संघटनेमध्ये नाराजी पसरली आहे. ‘भू-विकास’च्या राज्यातील २९ जिल्हा शाखा आणि एक शिखर बँक अस्तित्वात आहे. याशिवाय उपशाखांचीही संख्या मोठी आहे. या बँकांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रश्नावर नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीने बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीतून कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा व शासकीय नोकरीत त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी, बँका बंद करण्याच्या निर्णयामुळे कर्मचारी संघटनेत नाराजी पसरली आहे.
धुळे येथील कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांसह त्रिसदस्यीय समितीला पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली. विरोधात असताना फडणवीस आमच्यासोबत होेते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रश्न सुटण्याऐवजी बँका कायमच्या बंद करण्याचा निर्णय होत आहे. थकित पगार, थकित येणी यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे आता भू-विकास बँक कर्मचाऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा उल्लेख या पत्रात आहे.
राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सांगितले की, या पत्राची प्रत सर्व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडेही गेली आहे. त्यामुळे आता राज्यभरातून अशी पत्रे पाठवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत.
राज्यातील भू-विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार असला तरी, तो कर्जवसुलीवर अवलंबून आहे. बँका बंद करून मोबदला देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी कधीच केली नाही. याउलट बँकांचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी वारंवार संघटनेने केली आहे. अजूनही याच मुद्यावर संघटनेचा सरकारशी संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हिताची राज्यातील सर्वात महत्त्वाची बँक म्हणून सरकारने याबाबत विचार केला पाहिजे, असे संघटनेचे मत आहे. (प्रतिनिधी)