बिनविरोधचे घोडे जागावाटपात अडले

By Admin | Updated: April 23, 2015 00:36 IST2015-04-22T23:49:01+5:302015-04-23T00:36:50+5:30

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीची सहा तास मॅरेथॉन बैठक; इच्छुकांची उत्सुकता वाढली

The uncontrolled horses are stuck in the seat | बिनविरोधचे घोडे जागावाटपात अडले

बिनविरोधचे घोडे जागावाटपात अडले

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात ६ तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. जागावाटपातच बिनविरोधचे घोडे अडले आहे. गुरुवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
विश्रामबाग येथील एका हॉटेलमध्ये दुपारी १ वाजता सुरू झालेली संयुक्त बैठक सायंकाळी सात वाजता संपली. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच दोन महत्त्वाचे पक्ष होते. गेल्या पाच वर्षात दोन्ही पक्षातील तालुकास्तरावरील दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत गेल्यामुळे जागावाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रवादीने सर्वच पक्षांना एकत्रित घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीपतात्या पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादीने जागांचा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडला. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.
जागावाटपात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जागा वाटपाबाबत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुरतीच चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. राष्ट्रवादीकडून सध्या भाजप, शिवसेना या पक्षांनाही जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोधचे प्रयत्न होत असताना अन्य पक्षांबाबत काँग्रेस कोणतीही चर्चा करणार नाही, असेही स्पष्टीकरण करण्यात आले. सर्वपक्षीय विचार झाल्यास दोन्ही काँग्रेसच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी नेत्यांनी प्रत्येक पक्षाला सामावून घेण्याबाबतचा विचार मांडला आहे. असा विचार करताना काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या काही जागा कमी होऊ शकतात. त्यामुळेच एकत्रिकरणाचे घोडे सहा तासांच्या बैठकीनंतरही पुढे सरकले नाही. गुरुवारी पुन्हा याबाबत बैठक होणार आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत निर्णय होणार आहे, अशी माहिती मदन पाटील यांनी दिली. वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा सुरू असल्याने एका दिवसात निर्णय होऊ शकला नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The uncontrolled horses are stuck in the seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.