पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफी घेणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:53+5:302021-08-22T04:29:53+5:30
इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफी घेणारच
इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. २०१५चा शासन निर्णय रद्द करून २०१९च्या धर्तीवर विनाअट संपूर्ण कर्जमाफी घेण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, पूरस्थितीची पाहणी करताना, उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज देणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे म्हटल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय शासन निर्णयात नाही. पूर ओसरून महिना झाला, तरी सरकार काय करत आहे, हे कळत नाही.
ते म्हणाले, मागील सरकारला शेतीमधील काही कळत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, त्यांनी हेक्टरी ३८ हजार रुपयांची मदत दिली होती. या सरकारने सोयाबीनला गुंठ्याला ६८ आणि उसाला १३५ रुपये देऊन शेतकऱ्यांची घोर थट्टा केली आहे.
शिवाजीराव नाईक म्हणाले, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या मदतीतून वैरणीचा खर्चही निघणार नाही. निशिकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मंगळवारच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत.
यावेळी महेश खराडे, ॲड.एस.यू. संदे, विजय पवार, संदीप राजोबा, शाकीर तांबोळी, सनी खराडे, पोपटराव मोरे, धनाजी गावडे, अप्पासाहेब कांबळे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.
चौकट
मंगळवारी मोर्चा..
शेट्टी म्हणाले, मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसील कचेरीजवळून या आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात वाळवा-शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तेथे जाहीर सभा होईल.